जालन्यात बँकेत होत असलेल्या घोटाळ्यांचं सत्र सुरूच असून आता आणखी तिसरा बँक घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. बदनापूर येथील कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेवून तब्बल 7 कोटी 31 लाखांची फसवणूक झाल्याचं उघड झाले आहे.
विशेष म्हणजे या घोटाळ्यात बँक मॅनेजरचाही समावेश आहे. 22 एप्रिल 2026 रोजी बँकेत तपासणी सुरू असताना काही पाकिटात बनावट सोने असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर सखोल चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली.
बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्राँग रुममधून सोन्याच्या वस्तू चोरून खिशात ठेवत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल आहे. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तर सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक केली आहे. यात २२ पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले, तर ३० सोन्याची पाकिटे गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलं आहे. दरम्यान जालना मर्चंट, पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेनंतर आता बदनापूरमधील कॅनरा बँकेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडालीये.










