नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर एक एक भोंदूबाबा समोर येत आहे. मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे भोवती पोलिसांनी आता कारवाईचा फास आवळला आहे.
या गडगेवर पोलिसांनी दत्ताधाम इथं कारवाई केली आहे. यावेळी २०० पेक्षा जास्त व्हिडीओ पोलिसांनी जप्त केले आहे. तसंच ९० पेक्षा अधिक औषधे सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे, या औषधांचा वापर कशासाठी होत होता, याचा शोध पोलीस घेत आहे.
भोंदू अशोक खरात याचं प्रकरण ताजे असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एक भोंदू लोकांची आर्थिक लुट करत मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा करणारा बाबा पोलिसांच्या तावडीत आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार नावाने या भोंदूने आपला दरबार सुरू केला होता. राज्यभरातून हजारो लोक त्याच्या भोंदूगिरीचे बळी ठरले.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाम सरकार नावाने भोंदू राजेंद्र गडगे हा दरबार भरवत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून मंत्र तंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा त्याचा गोरखधंदा सुरू होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा भोंदू गजाआड गेला आहे. त्याच्या दरबारातून पोलीसांनी अनेक महत्वाचे पुरावे हस्तगत केले असून काही औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. याने आजवर अनेकांचे आर्थिक, मानसिक आणी शारीरिक शोषण केले असून पिडीतांनी समोर यावं आणी गुन्हा दाखल करावा असं आवाहन अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी केलंय..
भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांनी गडगेची सगळी कुंटली बाहेर काढली आहे. पोलिसांनी गडगेकडून आतापर्यंत २०० पेक्षा अधिक व्हिडीओ जप्त केले आहे. त्याचबरोरब नाशिक पोलिसांनी दत्तधाम येथून ९० पेक्षा अधिक औषधे जप्त केली असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवली आहे.
एवढंच नाहीतर गडगेकडून १३ प्रॉपर्टी खरेदीची माहितीही समोर आली आहे. याबद्दल सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडून मालमत्तेची माहिती मागवली जाणार आहे. भोंदू गडगेकडे असलेल्या १० वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांचा तपास सुरू आहे. तसंच ‘पुत्र प्राप्ती’ प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाकडून भोंदू गडगेला नोटीस सुद्धा बजावली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
तंत्र मंत्राने कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगे गजाआड गेला असून सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे.










