२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची प्रशनासकडून जोरदार तयारी सुरु आहे. नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या साधू, महंतांच्या निवासासाठी तपोवनात साधुग्राम वसविण्यात येणार आहे.
त्यासाठी तपोवनातील काही झाडे तोडण्याचे प्रस्तावित असल्याने त्यावरुन वादंग सुरु आहे. हे प्रकरण सध्या हरित लवादाकडे आहे. तपोवनात साधुग्राम वसविल्यावर सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर त्या जागेचे करायचे काय, या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळ्या स्वरुपात मांडण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमी आणि आपलं पर्यावरण संस्थेचे प्रमुख शेखर गायकवाड यांनीही साधुग्रामच्या जागेवर काय करता येणे शक्य आहे, त्यासंदर्भात एक प्राथमिक आराखडा तयार केला आहे.
यावेळी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली तीच मुळात साधुग्रामच्या विषयाने. साधुग्रामसाठी काही प्रमाणात झाडे तोडावी लागतील, याची माहिती मिळाल्यानंतर वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी संतप्त झाले. आणि तपोवनातील वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलनांची एकच मालिका सुरु झाली. सध्या हे प्रकरण हरित लवादाकडे असल्याने हे प्रकरण काही प्रमाणात शांत झाले आहे. महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान साधुग्राममधील प्रस्तावित वृक्षतोड विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शहरात ५० हजारपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचे जाहीर केले. परंतु, या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या साधुग्रामचे कुंभमेळा संपल्यानंतर करायचे काय, हा प्रश्न या गदारोळात अनुत्तरीतच आहे.
आपलं पर्यावरण संस्थेचे प्रमुख शेखर गायकवाड यांनी यासंदर्भात काही उपाय सुचविले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुंभमेळा उत्सवानंतर नाशिकचे धार्मिक पर्यटन कसे वाढेल, यासाठी तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर शाश्वत उपाययोजना केल्यास ती जागा पडीक न रहाता नाशिकची एक नवीन ओळख निर्माण होण्यास मदत होईल. तसेच पुढील कुंभमेळ्यातही संबंधित जागा साधुग्रामसाठी पुन्हा विनावाद वापरात आणता येईल, असे शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.
साधुग्रामची जागा कुंभमेळ्यानंतर १० वर्ष बेवारस पडून न राहता त्या जागेचा योग्य उपयोग केल्यास नक्कीच तपोवनाचे धार्मिक महत्त्व वाढून नाशिकचे धार्मिक पर्यटन वाढण्यासही मदत होईल. त्याअनुषंगाने संबंधित जागेचा विकास करण्याचे ठरवल्यास तिथे ज्या ठिकाणी डेब्रिज टाकले गेले आहेत. तिथे कुठलेही जुने झाड तोडण्याची गरज नाही. अशा ठिकाणी दोन मोठे जर्मन हँगर उभे करता येऊ शकतील. एका जर्मन हँगरमध्ये प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतील. अशा कार्यक्रमांसाठी एक चांगली जागा उपलब्ध होईल. त्यामुळे त्या भागात धार्मिक वातावरण निर्मिती होऊन, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. दुसऱ्या एका हँगरमध्ये नाशिकचे वैभव असलेली आर्ट गॅलरी उभारावी. त्यात कांदा, चिवडा, द्राक्ष, पैठणी, नाशिकच्या अवतीभवती असलेली धार्मिक ठिकाणे आणि गडकिल्ल्यांची माहिती द्यावी, असे गायकवाड यांनी सुचविले आहे.
काही भागांमध्ये नाशिकशी संबंधित रामायणातील काही प्रसंग देखावे स्वरुपात मांडता येतील (उदा. शुर्पणखेचे नाक कापले जाणे, मारीच वध, सीता हरण, जटायू वध) या देखाव्यांभोवती सुंदर अशी नैसर्गिक रचना करता येऊ शकेल. राशीवन, नक्षत्रवन करावे. अशा बऱ्याच छान गोष्टी करता येतील, असे शेखर गायकवाड यांनी सुचविले आहे.











