नांदेडच्या पवित्र न्यायालयात चालू कामकाजादरम्यान चक्क न्यायाधीशांच्या दालनाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका महिलेने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड न्यायालयात शनिवारी नियमित न्यायालयीन कामकाज सुरू होते. यावेळी माधुरी अमोल जाधव (वय ३३, रा. आंबेडकरनगर, नांदेड) या महिलेने कोणाचीही परवानगी न घेता न्यायाधीशांच्या दालनात आणि कोर्ट हॉलमध्ये मोबाइलद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसावर हात उचलल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी रुपाली भरे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माधुरी जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुट्टे हे करत आहेत.
न्यायालयाच्या आवारात आणि विशेषतः कामकाजादरम्यान चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे. न्यायालयीन कामकाजाची गोपनीयता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी न्यायालयाच्या आत फोटो काढणे किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र, तरीही काही नागरिक नियम धाब्यावर बसवून असे कृत्य करतात, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. या घटनेमुळे न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांशी हुज्जत
हा प्रकार लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी रुपाली मोरेश्वर भरे यांनी संबंधित महिलेला हटकले. येथे चित्रीकरण करू नका, मोबाइल बंद करा, असे सांगून त्यांनी माधुरी जाधव यांना दालनाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने आरोपी महिलेने रुपाली भरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना जोराची धक्काबुक्की केली.











