मागील काही दशकांपासून नवरा बायकोमध्ये तिसरा आणि तिच्या एंट्रीमुळे संसाराची राखरांगोळी झाल्याच्या घटना घडत आहे. नुसता संशय घेऊन नवऱ्याने बायकोची हत्या केल्याच्या घटना वारंवार घडत आहे.
पण, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका महिलेनं घरात घुसून प्रियकराच्या पत्नीची भरदिवसा हत्या केली. धक्कादायक म्हणजे, आरोपी महिलेनं आधी पिस्तूल रोखलं आणि नंतर चाकूने सपासप वार करून या महिलेची हत्या केली.
छत्रपती संभाजीनगरचा बजाजनगर परिसर. आज सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. पण साई श्रद्धा पार्कयेथील एका घरात जे घडलं, त्याने संपूर्ण मराठवाडा हादरला. ४० वर्षांच्या साधना सोनपेटकर यांची त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. हत्या करणारी दुसरी तिसरी कोणी नसून, त्यांच्या पतीची जुनी मैत्रीण म्हणजेच शैला सोनार होती. मृत साधना यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैला सोनार यांच्यात पूर्वी संबंध होते. या वादातून शैलाने यापूर्वी महेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. संबंध पूर्णपणे तुटल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी शैला सोनार ही पिस्तूल आणि चाकू घेऊन थेट साधना यांच्या घरात घुसली. यावेळी घरात साधना आणि त्यांची वयस्कर आजी होती. जुन्या वादातून तिघांमध्ये झटापट सुरू झाली. संतापलेल्या शैलाने साधना यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं आणि ट्रिगर दाबणार, इतक्यात आजीने धाडस दाखवलं. आजीने शैलाच्या हातातील पिस्तूल हिसकावून थेट खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. पिस्तूल गेलं तरी शैलाचा राग शांत झाला नव्हता. तिने सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि साधना यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या तरीही शैला वार करतच राहिली. या भीषण हल्ल्यात साधना यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी शैलाने स्वतःला घरात कोंडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून शैलाला ताब्यात घेतलं. प्राथमिक माहितीनुसार, साधना यांचे पती महेंद्र आणि आरोपी शैला यांच्यात जुने संबंध होते. या वादातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. एका बाजूला आजीने दाखवलेलं धाडस कौतुकास्पद ठरलं असलं तरी, दुसरीकडे अनैतिक संबंधांच्या वादातून एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याने बजाजनगरमध्ये संताप व्यक्त होत आहे.










