राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारी महत्वकांशी असलेली लाडकी बहिण योजनेला अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली आहे. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या योजनेला अजितदादा पवारांचे नाव देण्याबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्याला आमचे समर्थन राहिल, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर त्या माध्यमाशी बोलत होत्या.
अजित पवार यांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम जपल्या जाव्यात : मिटकरी
अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला ‘अजित दादांची लाडकी बहीण’ असं नाव द्यावं, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार यांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम जपल्या जाव्यात, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून, ही एक प्रकारची आदरांजली असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, ही योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आवश्यक असल्यास योजनेत काही बदल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय योजनेचं नाव बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळालाच असल्याचं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही म्हटलं आहे.
अजितदादांच्या अपघातावर संजय राऊतांचे प्रश्नचिन्ह, पंकजा मुंडे म्हणाल्या..
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. याबाबत बोलताना मुंडे म्हणाल्या की, हे मला सकाळी सांगण्यात आले. काय बिघाड झाला माहीत नाही. मी दौऱ्यावर निघणार होते त्यावेळी मला कळवण्यात आले की हेलिकॉप्टर उडू शकणार नाही. संजय राऊत यांनी अजितदादांच्या अपघातावर उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, अशा प्रकारची दिशाभूल झाली नाही पाहिजे, राजकारणात हे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे असे मुंडे म्हणाल्या.











