दावोस (स्वित्झर्लंड) येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या बाबतीत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या परिषदेदरम्यान राज्याने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार (MoU) केले असून, आणखी १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या गुंतवणुकीतून राज्यात ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या एकूण गुंतवणूक करारांपैकी ८३ टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणूक (FDI) स्वरूपातील आहे. ही गुंतवणूक १८ देशांमधून महाराष्ट्रात येणार असून, त्यामध्ये अमेरिका, जपान, सिंगापूर, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (UAE) यांसारख्या प्रगत अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. उर्वरित १६ टक्के गुंतवणूक परदेशी तंत्रज्ञान भागीदारीच्या माध्यमातून होणार आहे.
नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार
दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकारने एसबीजी, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, स्कोडा, फॉक्सवेगन, टाटा समूह, अदानी समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोकाकोला यांसारख्या जागतिक आणि देशांतर्गत नामांकित कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या करारांमुळे महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता अधिक बळकट होणार आहे.
आधुनिक आणि भविष्यकालीन क्षेत्रांवर भर
ही गुंतवणूक प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सेंटर्स, ग्रीन स्टील, फिनटेक, लॉजिस्टिक्स अशा आधुनिक आणि भविष्यकालीन क्षेत्रांत होणार आहे. यामुळे महाराष्ट्र तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण उद्योगांच्या बाबतीत देशात आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यभर समतोल गुंतवणूक वितरण
गुंतवणूक केवळ एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्व भागांत समतोल पद्धतीने वाटली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) आणि कोकण : सुमारे २२ टक्के गुंतवणूक
विदर्भ : १३ टक्के गुंतवणूक
उर्वरित महाराष्ट्र : सुमारे ५० टक्के गुंतवणूक
आकडेवारीनुसार,
कोकण विभागात सुमारे ३.५ लाख कोटी रुपये,
विदर्भात सुमारे २.७ लाख कोटी रुपये,
छत्रपती संभाजीनगर विभागात सुमारे ५५ हजार कोटी रुपये,
उत्तर महाराष्ट्रात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती
या भरीव गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक, तांत्रिक आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, राज्य देशातील सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे केंद्र म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.











