April 20, 2026 6:00 am

फुटली नाही, मी नवस फेडायला देवदर्शनाला गेले होते

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

निवडून आल्यानंतर नॉट रिचेबल असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के (Sarita Mhaske) हा पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आल्या आहेत. आपण ठाकरे गटातच असून इतर कुणाच्याही संपर्कात नसल्याचं त्या म्हणाल्या. निवडणुकीपूर्वी नवस बोलला होता, तो फेडण्यासाठी आपण तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले असल्याची माहिती सरिता म्हस्के यांनी दिली. तसेच सर्व माध्यमांमध्ये आपलेच नाव झळकत होते, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार फोन बंद केला होता अशी माहितीही त्यांनी दिली.

 

ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. त्यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली आणि नंतर त्यांच्यासोबत कोकण भवनला जाऊन नोंदणीही केली. मुंबईतील प्रभाग 157 मधून डॉ. सरिता म्हस्के ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या नॉट रिचेबल झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

 

वरिष्ठांच्या आदेशानंतर फोन बंद

डॉ. सरिता म्हस्के म्हणाल्या की, “मी तुळजापूरला देवदर्शनाला गेले होते, माझा नवस होता. काल कोकण भवनमध्ये येण्याचा मेसेज उशीरा आला. त्यामुळे मला कल्पना नव्हती, मी निघून गेले होते. जेव्हा आम्हाला ही बातमी समजली त्यावेळी आम्ही मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात होतो. वरिष्ठांनी आम्हाला आमचे फोन बंद करायला सांगितले होते. तुम्हाला ट्रेस केले जाईल, तुम्ही आमच्यापर्यंत येत नाही तोवर फोन बंद ठेवा असे आदेश होते.”

 

सरिता म्हस्के या म्हणाल्या की, “तुळजापूरला गेले होते, विरोधक आमच्या मागे असतात, म्हणून वरिष्ठांनी आमच्या सुरक्षेसाठी फोन बंद करायला सांगितलं होतं. मुंबईत आल्यानंतर आम्ही नार्वेकरांच्या घरी गेलो, तिथेच राहिलो. , अजूनही आम्हाला मोबाईल सुरू करण्याची परवानगी नाही. कोकण भवनमध्ये जाऊन नोंदणी केली, आता मी संपर्कात असेल.”

 

बदनामीसाठी विरोधकांचा डाव

आपण जिंकून आल्यानंतर विरोधकांकडून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप सरिता म्हस्के यांनी केला. सर्वच नगरसेवक महत्त्वाचे, दोन दिवसांपूर्वी मेसेज असता तर मी कालच नोंदणी करायला आले असते. पक्षाला आमच्यावर विश्वास आहे. दुसऱ्या पक्षाकडून कोणताही संपर्क झाला नाही असं त्या म्हणाल्या.

 

मी तीन वर्षे शिंदे गटात होते, युतीच्या सरकारमुळे सीट भाजपकडे गेली. मी मेहनत घेतली होती, उद्धव ठाकरे यांनी माझी मेहनत पाहिली होती. त्यांना माहीत होतं ही विनिंग सीट आहे. त्यामुळे त्यांनी मला संपर्क केला आणि शेवटच्या दिवशी मला AB फॉर्म मिळाला असं सरिता म्हस्के म्हणाल्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!