छाटणीच्या नावाखाली महापौर बंगला परिसरातील तब्बल २१ झाडांची कत्तल करण्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले खरे. मात्र, गेल्या महिनाभरात याबाबत कोणताही अहवाल देण्यात आला नाही.
अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचे समोर येत आहे.
शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीवर असते. यासाठी संबंधित नागरिकास त्या झाडाचा किंवा फांद्यांचा फोटो महापालिकेकडे अर्जासह सादर करावा लागतो. त्यानंतर, समितीकडून परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाचे बागकाम मिस्त्रींनी घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यातील निलगिरी, पिंपळ, जांभूळ, आंबा, उंबर आणि लिंबाची अशी २१ झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. या झाडांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी फांद्या काढणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव १२ एप्रिल रोजी शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला होता. सहायक आयुक्तांनी लगेचच तत्परता दाखवून दि. १३ मार्चला हा प्रस्ताव मंजूर करून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वृक्षसंवर्धन विभागाने दोन दिवसांपूर्वी फांद्या छाटणी केली. मात्र, प्रत्यक्षात फांद्या छाटणीच्या नावाखाली अनेक झाडे दहा फुटांपर्यंत कापून टाकली आहेत. काही झाडे बुंध्यापासून कापली आहेत. खोटी माहितीच्या टोलवाटोलवीमुळे या प्रकरणातील गोंधळ आणि विसंगतीसमोर आल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक पवित्रा घेत या प्रकरणाचा सविस्तर खुलासा देण्याचे आदेश उद्यान विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि भवन विभागाला महिनाभरापूर्वी दिले होते. या आदेशाला एक महिना होत आला तरी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने अद्याप अहवाल दिलेला नाही.
याविषयी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अहवाल अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे आल्याचे सांगितले. तर दिवटे यांनी संबंधित अहवाल उद्यान विभागाकडून आला नसल्याचे सांगितले. उद्यान विभागाचे प्रमुख डाॅ. अशोक घोरपडे म्हणाले, क्षेत्रीय कार्यालयाकडून अद्याप अहवाल आलेला नाही. अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीमुळे झाडे तोडण्याच्या प्रकरणावर प्रशासनाकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे.











