गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनेक ढोंगी बाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील मनोहरमामा भोलसे याचे देखील कांड समोर आले.
आता या भोंदूबाबावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेच्या असहाय्यतेचा फायदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना जानेवारी २०२५ च्या सुमारास घडली आहे. आर्थिक संकटात असलेल्या आणि चांगल्या रोजगाराच्या शोधात असलेल्या या महिलेला तिच्या एका मैत्रिणीने पुण्यातील वडाचीवाडी येथील भोंदूबाबा मनोहर भोसले याला भेटण्याचा सल्ला दिला होता. बाबा आपल्या सर्व अडचणी दूर करेल या भाबड्या आशेने या महिलेने त्याच्या आश्रमात जाण्यास सुरुवात केली. तिचा विश्वास संपादन करून भोसले याने तिला आश्रमातच राहण्यासाठी एक स्वतंत्र खोली दिली आणि विविध धार्मिक विधींचे कारण सांगून तिच्याकडून तब्बल अकरा हजार रुपये उकळले.
आर्थिक लूट केल्यानंतर या नराधमाने अत्यंत घृणास्पद कृत्य केले. एक दिवस पहाटेच्या वेळी तो थेट पीडितेच्या खोलीत शिरला आणि एका विशेष पूजेचा बहाणा करून त्याने तिला कपडे काढण्यास सांगितले. महिलेने या प्रकाराला तत्काळ आणि तीव्र विरोध केला. मात्र भोसले याने तिचे काहीही न ऐकता तिच्यावर बळजबरी केली आणि अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर, या घटनेबाबत बाहेर कोणालाही काहीही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने या असहाय्य महिलेला दिली.
या भयंकर प्रसंगामुळे आणि आरोपीच्या धमक्यांमुळे ही महिला प्रचंड दहशतीखाली होती. अखेर मागील जवळपास दीड वर्षे घाबरून राहिल्यानंतर तिने धाडस एकवटून करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या नराधमाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.
तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोहर भोसले याच्यावर बलात्कार, फसवणूक, मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. करमाळा पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या भोंदूबाबाने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.











