गोकुळ दूध संघाच्या सत्ताकारणावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांच्यात नव्याने संघर्षाची ठिणगी पडल्याने आगामी निवडणुकीसाठी महायुतीच्या आघाडीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
मुश्रीफमुक्त गोकुळ असे विधान करून शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकवार मुश्रीफ यांना ललकारले आहे. मुश्रीफ यांचा सहभाग असलेल्या आघाडीत आपण समाविष्ट होणार नाही असे त्यांनी म्हटले असल्याने मुश्रीफ यांच्या संभाव्य आघाडीत भाजपचे अन्य कोणी नेते सहभागी होणार का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे महायुतीची नेमकी आघाडी कशी असणार याची चर्चा रंगू लागली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे लोणी मटकावण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची स्पर्धा सत्ता स्पर्धा रंगली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अन्य नेत्यांना सोबत घेऊन महाडिक यांच्या २५ वर्षाच्या सत्तेला आव्हान देत राजकीय बदल घडवून आणला होता. पाच वर्षानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
आता हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी व्हाया महायुतीच्या छावणीत गेले आहेत. त्यांनी हल्ली गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचा घोषा लावला आहे. अर्थात, महायुतीच्या आघाडीत नेमक्या कोणाला आणि किती संधी मिळणार हा वादाचा प्रश्न असताना अलीकडे महायुतीच्या आघाडीच्या या अस्तित्वाला भाजपकडूनच आव्हान मिळू लागले आहे.
चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळचे सत्ताधारी नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारी कारभारावर तिखट शब्दांत प्रहार चालवला आहे. इतकेच नव्हे तर हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यावधी रुपये बँकेत आणून बदलून घेतले. यातून बँकेला अडचणीत आणले, असा घणाघाती आरोप करून एकच खळबळ उडवून देताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभारही भ्रष्टाचारापासून दूर नाही असेच जणू दाखवून दिले. आमदार पाटील यांच्या या विधानाने संतप्त झालेले हसन मुश्रीफ यांनी आमदार शिवाजी पाटील यांनी यांनी दहा दिवसांत पुरावे जाहीर करावेत. अन्यथा या बदनामीबद्दल १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला. तथापि, मुश्रीफ यांच्या या विधानाला आमदार पाटील यांनी अजिबात किंमत दिली नाही. कोणत्याही नोटिशीला घाबरत नसल्याचे प्रतित्तुर देताना आमदार पाटील यांनी १०० कोटी रुपये आणायचे कोठून. त्यासाठी मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेतून साखर कारखान्यांना २०० ते ६०० कोटी रुपये कर्ज रुपात देतात, तसे मला त्यांनी २०० कोटी रुपये कर्जाऊ द्यावेत, अशी मागणी करीत मुश्रीफ यांचीच एकप्रकारे खिल्ली उडवली.
त्याही पुढे जात आमदार पाटील यांनी गोकुळचा कारभार हा मुश्रीफमुक्त राहील असे म्हणत गोकुळच्या राजकारणामधील त्यांच्या राजकीय अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. शिवाय, हसन मुश्रीफ असणाऱ्या आघाडीत आपण सहभागी होणार नाही, असे सांगून महायुतीच्या संभाव्य आघाडीला तडा दिला आहे. शिवाजी पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहकारी मानले जात असल्याने मुश्रीफ यांना गोकुळच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचे राजकारण वर्षापासूनच सुरू झाले आहे का आणि आमदार पाटील यांच्या या भूमिकेला जिल्ह्यातील महाडिक कुटुंबाकडून प्रतिसाद मिळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, शिवाजी पाटील यांनी मुश्रीफमुक्त गोकुळ असे म्हटले असले तरी कोणतीही निवडणूक ही मतांच्या गोळाबेरजेवर अवलंबून असते. मुश्रीफ यांच्याकडे सध्या मतांचा पुरेसा आकडा आहे. शिवाय त्यांच्याकडून नव्याने मोठ्या प्रमाणात दूध संस्थांची नोंदणी केली असल्याने त्याचीही भर पडली आहे. या तुलनेत शिवाजी पाटील यांच्याकडे गोकुळ मध्ये सत्ता बदल घडवण्यासाठी आवश्यक त्या ठराव धारक मतदारांची बेगमी अल्प प्रमाणात आहे. मताधारे मताद्वारे बदल घडवण्याची क्षमता नसेल तर शिवाजी पाटील यांचे मुश्रीफमुक्त गोकुळ हे विधान प्रसिद्धीपुरते राहू शकते. याचमुळे की काय हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ मुश्रीफमुक्त करायचे की मुश्रीफ युक्त याचा निर्णय संस्थाचालक ठराव धारक घेऊ शकतात. एकटे शिवाजी पाटील नव्हे’, असे केलेले विधान वास्तववादी ठरते. तथापि, मुश्रीफ समर्थकांच्या वाढवण्यात आलेल्या प्राथमिक दूध संस्था या बेकायदेशीर असल्याचा मुद्दा घेऊन गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांनी आव्हान दिले आहे. या नव्या संस्था मतदानासाठी पात्र राहणार का, हा गोकुळच्या निवडणुकीतील महत्त्वपूर्ण वळण बिंदू असणार आहे.











