काबाडकष्ट करून मुलीचा विवाह त्यांनी थाटामाटात लावून दिला. दोन आठवड्यानंतर मुलगी विवाहानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार असल्याने कुटुंबात जावयाच्या स्वागताची घरात तयारी सुरू असताना सासऱ्याने रंकाळा तलावात उडी मारून जीवन संपविले.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अरुण दिनकर गवळी (वय ५६, रा. हराळे गल्ली, खंडोबा तालीम जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, महाद्वार रोडवरील एका खेळण्याच्या दुकानात काम करत होते. गवळी कुटुंबीय शिवाजी पेठेत राहतात. त्यांना पत्नी, एक मुलगा आणि पंधरा दिवसांपूर्वी लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी असे कुटुंबीय आहे. मुलगी आणि जावई बुधवारी पहिल्यांदाच घरी येणार असल्याने घरात त्यांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. अरुण यांनी पहाटे पाच वाजल्यापासून उठून घरातील स्वच्छता केली. जेवणाच्या कार्यक्रमासाठी लागणारा सर्व बाजार आणून दिला. अजूनही काही तयारीसाठी राहिले आहे का, असेही पत्नीला विचारले.
त्यानंतर ते सकाळी नऊ वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. तेथून ते पद्माराजे गार्डन येथे गेले. समोरच असलेल्या रंकाळा तलावात क्षणार्धात उडी घेतली. या वेळी काही तरुण या ठिकाणी पोहत होते. तर काठावरील नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. काहींनी पाण्यात उडी मारून त्याचा शोध सुरू केला. मात्र ते सापडले नाहीत.
दरम्यान, अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे दिली. दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल केले. त्यांनी अरुण यांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अरुण गवळी हे शांत आणि कष्टाळू होते. त्यांनी अचानक उचललेल्या या टोकाच्या पावलाने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.











