मिरा-भाईंदर महापालिकेतील भाजपाच्या बहुमतातील ठरावांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रेक लावल्याची चर्चा रंगली… आमदार रोहित पवार यांनी एका मुलाखतीत केलेल्या सूचक विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली… महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी होणार, याबाबतची तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली… खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विधानाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाचार घेतला… शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अटकेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र निषेध केला.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाकडून बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येणाऱ्या ठरावांना नगरविकास खात्याकडून ब्रेक लावण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भाजपामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे भविष्यात भाजपा-शिंदेसेनेतील वाद आणखीनच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली, तर शिंदे गटाची मोठी पिछेहाट झाली. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींमध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील संघर्ष अधिक वाढला आहे. स्थानिक पातळीवरील या वादाचे पडसाद आता राज्य पातळीवर उमटू लागल्याचे चित्र आहे. भाजपाकडून महासभेत मंजूर करण्यात येणारे काही ठराव हे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित पदाधिकारी व संस्थांना लक्ष्य करणारे आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यात थेटपणे हस्तक्षेप करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद कोणत्या वळणावर पोहोचणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होऊन भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर (NDA) सत्तेत गेल्यास मी दुसरा पर्याय निवडेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार यांनी नुकतीच लोकमतच्या महापंचायतमध्ये मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जर शरद पवार यांचा पक्ष विलीन होऊन एनडीबरोबर गेल्यास मी दुसरा पर्याय निवडेल, पण भाजपाबरोबर जाणार नाही, असे रोहित यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर उत्तर देणे त्यांनी टाळले. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, हे विलीनीकरण होणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी नेमकी कधी होणार, याबाबतची तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. येत्या ३० जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार, अशी माहिती त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेतून दिली. पुढच्या हंगामासाठी या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा असेल, तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे कृषी संदर्भातील ८० टक्के कर्जाचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांची, खतांची उपलब्धता तसेच यावेळी पावसाचा अंदाज या सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी या सर्व विषयाची माहिती दिली.
खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विधानाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाचार घेतला. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. त्यातून त्यांची गोंधळलेली मानसिकता दिसून येते. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु लोकशाहीतील घटनात्मक पदांवर असलेल्या नेत्यांनी अशी भाषा आणि शब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे. हा देशवासीयांच्या भावनांचा अपमान आहे. देशातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या या द्वेषपूर्ण राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे आणि यापुढेही देत राहील, अशा शब्दात गडकरी यांनी टीका केली. “देश आर्थिक संकटात आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. एकीकडे शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे समाजमाध्यमांवर रिल्स बनवत आहेत हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून, या कारवाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वेगाने वर सरकत आहे, जनता दहशतीच्या छायेखाली आहे. मात्र, गृहमंत्रालय सुस्त आहे. एकीकडे गुन्हेगारांना हँड द्यायचा आणि दुसरीकडे लवांडे यांच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना सूड भावनेतून अटक करायची, ही कुठली पद्धत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात, गँगवॉर होतात, महिलांवर आणि चिमुरडींवर अत्याचार होतो. राज्यात गुडांना मोकळे रान मिळते. परंतु, राजकीय नेत्यांना अटक केली जाते. या सर्व गोष्टी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांगायला पुरेशा आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.











