वांद्रे पूर्वेकडील स्टेशनबाहेरच्या गरीब नवाज झोपडपट्टीवर असलेल्या झोपड्यांवार आज तोडक कारवाई करण्यात आली. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या झोपड्या तीन मजली, चार मजली होत्या.
काही दुमजली होत्या. म्हणजे या झोपड्या मिनी इमारतच होत्या. हे बांधकामही अनधिकृत होतं. त्यामुळे या सर्व झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते.
वांद्रे पूर्व रेल्वे परिसरातील गरीब नगर भागात रेल्वे प्रशासनाने आज सकाळीच मोठी कारवाई सुरू केली. रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम करण्यात आले. अजूनही हे पाडकाम सुरू आहे. अनेकदा सांगूनही इथले रहिवाशी जात नव्हते. अनेकदा नोटीसा बजावल्यानंतरही झोपड्या जैसे थे असल्याने आज अखेर या झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला.
रेल्वे परिसरात बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या हटवण्यासाठी 6 बुलडोझर आणण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच रेल्वेने ही कारवाई केली आहे. हा भाग मोकळा झाल्यावर त्या ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जातं.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. RPF, GRP आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात सज्ज ठेवण्यात आला होता. कारवाईदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील दोन पूल बंद करण्यात आले होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विनीत अभिषेक यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, “उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानुसार अतिक्रमण हटवले जात आहे. रेल्वेला चालना देण्यासाठी नवीन मार्ग टाकणे गरजेचे असून त्यासाठी जमीन मोकळी करावी लागेल.” सध्या पाडकाम सुरू असून, ही मोहीम लोकांच्या सहकार्याने राबवली जात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.











