May 14, 2026 7:13 am

‘नीट’ परीक्षा रद्द : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, लातूरमध्ये संतापाची लाट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

“दोन वर्षांची मेहनत सफल झाली असे वाटत असतानाच पुन्हा परीक्षा द्यावी लागणे खूप वेदनादायक आहे. वारंवार पेपर फुटण्याच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्या विश्वासाने तयारी करावी, ही केवळ परीक्षा व्यवस्थेची चूक नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि मानसिकतेशी खेळ आहे,” असे मत ‘ नीट’ परीक्षा देणारे सारंग गावडे यांनी व्यक्त केले.लातूरहून दरवर्षी किमान दीड हजार विद्यार्थी वैद्यकीय, दंत महाविद्यालयात प्रवेशित होतात.

त्यामुळे ‘ नीट ‘ परीक्षा रद्द झाल्याचा सर्वात अधिक संताप लातूरमधून व्यक्त झाला. शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे म्हणाले, ‘ पुढील तीनचार महिने विद्यार्थ्यांची नव्या परीक्षेसाठी मानसिकता तयार करणे हे कमालीचे अवघड काम असते. आता विद्यार्थी पुन्हा गावी परतले आहेत. त्यांची आता ऑनलाईन बैठक घेऊन पुन्हा महाविद्यालयात त्यांना बोलवावे लागेल. तरच पुढची तयारी करता येईल. पण पेपट फुटीचे असे प्रकार वारंवार होत राहिले तर अवघड होईल.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका मागील दोन वर्षांपासून मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतून नीटची तयारी केली होती. परीक्षा चांगली गेल्याने चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र परीक्षा रद्द झाल्याची माहिती अचानक समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरत आहे.

पुन्हा शहरात जाऊन राहणे, वसतिगृहासाठी खर्च करणे, शिकवणी वर्ग किंवा चाचणी सराव करणे, यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंता वाढली आहे. अनेक विद्यार्थी चांगले महाविद्यालय मिळावे म्हणून दुसऱ्यांदाही परीक्षा देतात. लातूरमध्ये हे प्रमाण ३० टक्के एवढे आहे. या मुलांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होण्याची शक्यता आहे, असे मत विद्या आराधना संस्थेचे संचालक सतीश पवार यांनी व्यक्त केले.

‘मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या कष्टाने शिक्षण घेतात. आई-वडील मोठ्या मेहनतीने पैसा उभा करून मुलांना शिकवतात आणि त्यांच्या भविष्यासाठी स्वप्न पाहतात. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून निघणारे नाही,” अशी भावना व्यक्त होत आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!