राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे श्रम व संस्कारांचे व्यासपीठ आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा राजमार्ग सुकर करण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाचे धडे घ्यावेत, असे प्रतिपादन श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी केले.
तळिये (ता. कोरेगाव) येथे प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते. याप्रसंगी प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे, राजमाता नर्सिंग कॉलेजचे संस्थापक नरसिंग दिसले, तळियेचे सरपंच सुशीलकुमार शीलवंत, उपसरपंच विक्रम चव्हाण, युवराज चव्हाण, अमर चव्हाण, शरद चव्हाण, मोहनराव देशमुख, बाजीराव चव्हाण, कालिदास चव्हाण, राजेंद्र जाधव, श्रीधर भोसले, नीलेश माने, वसंतराव गायकवाड, जनार्दन चव्हाण, प्रियांका शीलवंत, मुख्याध्यापिका प्रमिला नलवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमच्या महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर यशस्वीपणे घेऊन तळिये गावाने देऊरशी असलेला ऋणानुबंध आणखीनच घट्ट केल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विळख्यात न अडकता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आपल्या आईवडिलांची स्वप्ने साकार करावीत, असे श्री. दिसले यांनी सांगितले. माजी सरपंच पोपटराव चव्हाण, भाऊसाहेब वाघ, आर. जी. चव्हाण, सारिका चव्हाण, तसेच नाजीम पठाण, जान्हवी माने, श्रेया भोसले, आलिशा दफेदार, आकांक्षा माने यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी गावातर्फे सत्यवान चव्हाण यांच्या हस्ते शिबिरार्थींना ट्रॉफी देण्यात आली. रणजित घनवट यांच्या हस्ते महाविद्यालयास देण्यात आलेल्या ट्रॉफीचा स्वीकार प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे यांनी केला. डॉ. कमलसिंग क्षत्रिय यांनी प्रास्ताविक व डॉ. संध्या पौडमल यांनी स्वागत केले. सहायक प्रा. सूर्यकांत अदाटे व प्रा. मनीषा पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उत्तम आळतेकर यांनी आभार मानले











