मुंबई शहरातून गेल्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ८ मुलींचा समावेश असून, हे मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झाल्याची नोंद आहे.मुंबई पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
तस्करीच्या टोळ्यांचा हात?
दरम्यान, मुंबईत मानव तस्करी करणाऱ्या संघटीत टोळ्या सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारींवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७ (२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता मुलांची ठिकाणे
शिवाजी नगरः ४ मुले
साकीनाकाः २ मुले
अँटॉप हिल: २ मुले
ओशिवरा, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपरः प्रत्येकी १ मुले
पालकांकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे खंडणीचे कॉल आलेले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरीही, हे प्रकार एकाच वेळी घडल्याने तस्करीच्या टोळ्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांकडून विशेष मोहीम
मुंबई पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली आहे. शहरातील गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणी, पायी गस्त आणि तांत्रिक सर्वेक्षण वाढवले आहे. वेगवेगळ्या पथकांना शोधकार्यासाठी नेमले गेले आहे.
वाढते प्रमाण चिंताजनक
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. जून ते डिसेंबर २०२५ या काळात १४५ मुले बेपत्ता झाली होती, त्यापैकी ९३ मुली होत्या. विशेषतः १ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या ३६ दिवसांत ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे, ज्यात निम्म्याहून अधिक मुली होत्या (४१ मुली आणि १३ मुले).











