आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरुद्ध अपमानास्पद अन् वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आंध्र प्रदेशमधील वातावरण तापलेय.मुख्यमंत्र्यांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुंटूरमध्ये तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला. इब्राहिमपट्टणम, एनटीआर जिल्ह्यातही तणावाची स्थिती कायम आहे.
वायएसआरसीपी नेते आणि माजी मंत्री जोगी रमेश यांच्या घराची जमावाने तोडफोड केली अन् त्यानंतर आग लावली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आयटी मंत्री नारा लोकेश यांच्याविरुद्ध जोगी रमेश यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर आंध्र प्रदेशमधील वातावरण तापलेय. मागील ४८ तासांपासून आंध्र प्रदेश धगधगतोय.
माजी मंत्री जोगी रमेश यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) कार्यकर्त्यांनी जोगी रमेश यांच्या घरात तोडफोड केली अन् आग लावली. कार्यकर्त्यांनी घराच्या काही भागांना आग लावल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. तणाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला.
मैलावरम, विजयवाडा पश्चिम, जी. कोंडूर आणि इब्राहिमपट्टनम येथील टीडीपी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले अन् आंदोलन सुरू केले आहे. टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून वायएसआरसीपी नेत्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे. लोकांचा रोष पाहून जोगी रमेश आधीच घराबाहेर पडले. घटनेच्या वेळी त्यांचे वडील जोगी मोहन राव, पत्नी शकुंतला देवी आणि धाकटा मुलगा रोहित घरी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त करण्यात आली.
जोगी रमेश यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच वायएसआरसीपी नेते अन् समर्थक तात्काळ दाखल झाले. त्यामुळे इब्राहिमपट्टणमम्ये तणाव वाढला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण संघर्ष झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवले. त्यानंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली. एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर केलेल्या विधनामुळे आंध्रप्रदेशमध्ये तणाव वाढलाय. दोन पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेत.











