पुणे:- पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येरवडा-कात्रज भूमिगत बोगद्याच्या प्रस्तावाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तब्बल 56 बोगदे बांधले जाणार असल्याची घोषणा केली. आता कात्रजचा घाट नाही तर कात्रजचा बोगदा चर्चेत येणार आहे. रस्त्यावरची वाहतूक कोंडी जमीनीच्या आत जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. काही पुलाचे बांधकाम बिनडोकपणे केलं गेले आहे. पुण्यातील काही भागात एलिव्हेटेड कॉरिडॉर करायचं ठरवलं आहे. खाली रस्ता आहे वर कॉरिडॉर असेल आणि त्यावर मेट्रो असेल. 32 रोड वर पुण्याचे ट्रॅफिक चालतो असं एका अहवालातून समोर आलं. दीड पट ते अडीच पट त्यावर वाहतूक आहे. पुण्यातील 32 रस्त्यांना डी कन्जेस्ट केलं जाणार आहे. पुण्यात 23 उड्डाण पुलं होणार, ज्यातील 8 चे काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात पाताल लोक अर्थात भुयारी रस्ते निर्माण केले जाणार आहेत. पुण्यात 56 बोगदे बांधले जातील. येरवडा ते कात्रज, औंध संगमवाडी असे बोगदे आहेत. 32 हजार करोड रुपये खर्च येणार असून याचे डिझाइन सुद्धा तयार झाली आहेत. पुण्यातील 40 टक्के वाहतूक कोंडी रिंग रोड झाल्यावर कमी होईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
येरवडा-कात्रज कनेक्शन
हा बोगदा शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणारा एक प्रमुख मार्ग म्हणून काम करेल. सर्वात वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक भूमिगत वळवली जाईल.हा फक्त एक बोगदा नाही तर 54 किलोमीटरचे भूगर्भातील जाळे आहे जे जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी सारखे प्रमुख क्षेत्र व्यापते. संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे ३२,००० कोटी रुपये आहे, जो राज्य सरकारकडून निधी दिला जाईल. भूमिगत मार्ग रिंगरोडशी जोडला जाईल, ज्यामुळे महामार्गाकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.











