शहरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यात उद्या रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांना ग्रुपने घराबाहेर पडता येणार नाही.
खरं तर, सध्या देशात आणि राज्यात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे आणि इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढले जात आहेत. यामुळे शहरातील शांतता धोक्यात येऊ नये आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याचं बोललं जात आहे.
पुढील १४ दिवस पुण्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी असेल. कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, तलवारी किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाहीत. याशिवाय सार्वजनिक शांतता भंग करणारे कोणतेही कृत्य, आक्षेपार्ह गाणी, भडकाऊ घोषणाबाजी किंवा चिथावणीखोर भाषणे देता येणार नाहीत. यावर कडक निर्बंध असतील.
जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन करून शहरात शस्त्रे किंवा कोणतीही धोकादायक वस्तू बाळगल्याचं आढळून आलं, तर पोलीस त्या वस्तू तत्काळ जप्त करू शकतात आणि संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
हा आदेश सामान्यतः १४ ते १५ दिवसांपर्यंत लागू ठेवता येतो. जर या १४ दिवसांनंतरही शहरातील परिस्थिती पाहता आदेश पुढे वाढवायचा असल्यास, त्यासाठी राज्य सरकारची रीतसर मंजुरी घ्यावी लागते. पुणेकरांनी या काळात पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.











