उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र समोर आले आहे. उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी परिसरात गुरुवारी (21 मे) सायंकाळी भररस्त्यात गोळीबाराची थरारक घटना घडली.
जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत सात राऊंड फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी परिसर अचानक गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. अंबरनाथ गाव आणि कैलास कॉलनी चौकातील काही गुंडांमध्ये सुरू असलेल्या जुन्या वादातून हा रक्तरंजित संघर्ष झाल्याचे बोलले जात आहे. या गोळीबारात अनिल हरकेश चौहान आणि अमन चौहान यांचा मृत्यू झाला, तर अर्जुन सुरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी आणि मृतांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अर्जुन चौहान याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर कैलास कॉलनी परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त वाढवला आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. गोळीबार करणारे आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच आरोपी कोण आहेत याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.











