नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिच्या खून प्रकरणाची सुनावणी गुरुवारपासून (ता. २१) विशेष न्यायालयात सुरू होणार आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात रोजच्या रोज सुनावणी घेऊन जलदगतीने हे प्रकरण चालविण्यात येणार आहे.
सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून, त्याला विशेष न्यायालयाचा दर्जाही देण्यात आला आहे. सुनावणीसाठी आरोपीला कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुनावणी ‘इन-कॅमेरा’ पद्धतीने होणार असून मुलीच्या कुटुंबाची गोपनीयता आणि संवेदनशील बाबींचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाकडून आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे.
या गंभीर प्रकरणाची प्रभावी मांडणीसाठी राज्य शासनाने ॲड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पुढाकार घेत १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोलिस निरीक्षक विजयमाला पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुमारे एक हजार १०० पानी दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी अवघ्या १४ दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले आहे.











