पुणे : पुणे शहर आणि परिसरात भरधाव टँकरमुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, आणखी एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील तुळापूर फाटा परिसरात पाणी वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने ४७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
दत्तात्रय मोहन पंडीत (वय ४७, रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पंडीत हे ८ मे रोजी रात्री तुळापूर फाटा परिसरातून आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पाणी वाहतूक करणारा भरधाव टँकर त्यांच्या दुचाकीच्या जवळ आला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पंडीत गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताचे चुलतभाऊ रविराज पंडीत (वय २६) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून टँकर अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. विशेषतः पाणी वाहतूक करणारे टँकर भरधाव वेगाने रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा अरुंद रस्ते, वाहतुकीची गर्दी आणि निष्काळजी वाहनचालक यामुळे गंभीर अपघात घडत असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी वानवडी भागात भरधाव टँकरच्या धडकेत एका अभियंता तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हडपसरमधील महंमदवाडी परिसरात महाविद्यालयीन तरुणाचा टँकर अपघातात बळी गेला. तसेच बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाचाही टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने टँकर चालक आणि मालकांची बैठक घेतली होती. यावेळी वाहन चालवताना वेगमर्यादा पाळणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. भरधाव आणि निष्काळजी वाहन चालविणाऱ्या टँकर चालकांचे परवाने रद्द करावेत, टँकर वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे आणि संवेदनशील भागात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Post Views: 5











