सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देशभरात ‘रामराज्य निर्माण अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि श्री महालक्ष्मी देवीच्या कृपेने पावन झालेल्या करवीर नगरीत १० मे २०२६ या दिवशी भव्य अशा हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीच्या माध्यमातून रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री संप्रदाय, ‘भागिरथी महिला मंच’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, ‘इस्कॉन’, भजनी मंडळ, भाजप, शिवसेना, पतित पावन संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, चिन्मय मिशन, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ यांसह विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांसह मोठ्या संख्येने हिंदू सहभागी होते. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती.
मिरजकर तिकटी येथे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. जयंतीभाई पटेल यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा देव यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीत चारचाकी वाहनात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिंडीचा उद्देश स्पष्ट केला.
मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज होता, तर मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, श्री महालक्ष्मी देवी आणि श्री जोतिबा देव यांचे छायाचित्र असलेली पालखी होती. दिंडी जात असतांना वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून, तसेच पुष्पवृष्टी करून अनेकांनी स्वागत केले.











