पाटस रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आज सकाळी घडलेल्या एका थरारक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कानगाव बाजू कडून पाटस रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत असताना उभी असलेली मालगाडी अचानक सुरू झाल्याने एका महिलेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी थेट मालगाडीखाली झोपावे लागले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला स्थानक परिसरातून रुळ ओलांडत असताना मालगाडी अचानक सुरू झाली. क्षणात परिस्थिती गंभीर बनल्याने महिलेने प्रसंगावधान राखत मालगाडीखाली झोपून स्वतःचा जीव वाचवला. हा प्रकार पाहून उपस्थित प्रवाशांनी एकच धावाधाव केली.
पाटस रेल्वे स्थानकावर सुरक्षित पादचारी मार्ग, फूट ओव्हर ब्रिज आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावे लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र रखडलेल्या कामांना अद्याप अपेक्षित गती मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, स्टेशन परिसरात कायमस्वरूपी आरपीएफ जवान तैनात करणे, सुरक्षित मार्गाची त्वरित व्यवस्था करणे तसेच फूट ओव्हर ब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ‘कामांना मंजुरी मिळूनही ती वेळेत पूर्ण होत नसतील आणि निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?’ असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर पाटस रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीर बनला असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
रेल्वे स्थानकावर कानगाव बाजू कडून आलेले प्रवाशांना पोचण्यासाठी कोणतेही प्रकारचे पर्याय व्यवस्था व फुलाची व्यवस्था नसल्यामुळे रूळ ओलांडून स्थानापर्यंत जावे लागते. अशातच आज कोणत्याही प्रकारचा सिग्नल न देता किंवा हा नवा जाता रेल्वे चालू करण्यात आले यावेळेस मी व माझ्यासारखे असे दोन प्रवासी तरुणांनी उड्या मारल्या मला उडी मारता न आल्यामुळे मी रेल्वे खाली झोपून घेतले व स्वतःचा जीव वाचवला.
‘कानगाव बाजूकडून रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीही सुरक्षित पर्यायी व्यवस्था किंवा पादचारी पूल नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रूळ ओलांडावे लागतात. आज अचानक कोणताही इशारा किंवा सिग्नल न देता रेल्वे सुरू करण्यात आली. त्या वेळी माझ्यासह दोन तरुणांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या; मात्र मला उडी मारता आली नाही. त्यामुळे रेल्वेखाली झोपून मी स्वतःचा जीव वाचवला. स्थानक परिसरात तातडीने सुरक्षित व्यवस्था उभारण्याची गरज आहे.’











