मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईच्या कामांचा ढिसाळ कारभार आयुक्तांसमोर उघड झाला आहे. बुधवारी सायंकाळी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी फळ व भाजीपाला बाजार परिसराची पाहणी केली असता अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि कचऱ्याचे ढीग पाहून त्यांनी एपीएमसी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले.
‘ही अवस्था अजिबात सहन केली जाणार नाही. ठरलेल्या मुदतीत सुधारणा झाली नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,’असा स्पष्ट इशारा त्यांनी एपीएमसी प्रशासनाला दिला.
पाहणीदरम्यान आयुक्तांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून मार्गक्रमण करावे लागले. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा, तुंबलेले सांडपाणी आणि दुर्गंधी असल्याचे तर नाशवंत फळे-भाजीपाला, प्लास्टिक आणि पॅकेजिंग साहित्य वेळेत न उचलल्याने बाजार परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. काही भागांत सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने व्यापारी, हमाल आणि ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
एपीएमसी बाजाराचा तळभाग बाहेरील रस्त्यांच्या तुलनेत खालच्या पातळीवर असल्याने पावसाचे पाणी सहज बाहेर पडत नाही. त्यातच नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा अडकल्याने पावसाळ्यात बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. परिणामी मालवाहतुकीवर परिणाम होतो. गेल्या काही वर्षांपासून ही समस्या कायम असतानाही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर डॉ. शिंदे यांनी अभियांत्रिकी विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. नाल्यांचे फ्लशिंग, अतिरिक्त पंपांची व्यवस्था, नियमित साफसफाईसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि कचरा उचलण्यासाठी ठोस वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच स्वच्छतेच्या कामांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले. एपीएमसी प्रशासनाला आठ दिवसांच्या आत विशेष स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सुधारणा न झाल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या एपीएमसीमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः भाजीपाला आणि फळ बाजारात पॅकेजिंग साहित्य, प्लास्टिक आणि इतर कचऱ्याची भर पडत असल्याने नाल्यांमध्ये गाळ साचून पाण्याचा प्रवाह अडतो.
कांदा-बटाटा बाजारातही सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याने पावसाळ्यात परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी बाजारातील अंतर्गत आणि बाहेरील रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो.
यंदाही पावसाळा तोंडावर असताना कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईची कामे अपेक्षित गतीने न झाल्याचे चित्र आयुक्तांच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना न झाल्यास एपीएमसी परिसरात पुन्हा पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एपीएमसीतील पाचही बाजारांची स्वच्छता नियमितपणे होत असल्याचा दावा स्वच्छता अधिकाऱ्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. बाजारातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दरवर्षी एपीएमसी प्रशासनाकडून पावसाळापूर्व नालेसफाई केल्याचा दावा होत असला तरी प्रत्यक्षात मात्र पाचही बाजार परिसरात पाणी साचण्याची समस्या कायम उद्भवते. नालेसफाईसाठी कोट्यवधींचा खर्च होतो मात्र तरिही नाले का तुंबतात, असा सवाल बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.











