बीड जिल्ह्यातील एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. बीड जिल्ह्यातील महसूल घोटाळ्यात एक मोठा मासा गळाला लागला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपातील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे. या अटकेच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दुजोरा दिला असून, या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाठक यांची या प्रकरणावरून दिवसभर कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना लातूरमधील राहत्या घरातून ताब्यात घेतलं. या घोटाळ्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून सुरू असून, आता थेट तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई झाल्याने हे प्रकरण गंभीर वळणावर पोहोचलं आहे.
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनावेळी शेतकऱ्यांचा मावेजा आणि जमिनीच्या संपादनात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अविनाश पाठक यांच्या नावाचाही समावेश होता.
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार या करत होत्या. मात्र, त्या सध्या रजेवर असल्याने या तपासाची जबाबदारी एम. व्यंकटराम यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर आता अविनाश पाठक यांना लवकरच बीड न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे आर्थिक घोटाळ्यात अटक झाल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एसआयटीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे या प्रकरणातील इतर मोठ्या नावांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, पुढील तपासात अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











