पुण्यातील पर्वती परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.नसरापूर घटनेच्या जखमा अजून ताज्याच होत्या, की एका ७० वर्षीय नराधम आजोबाने आपल्याच ९ वर्षांच्या सख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट असून, पीडित मुलीच्या मातेने आपल्या नराधम पित्याला थेट फाशी देण्याची मागणी केली आहे.
पीडित मुलीची आई कपड्याच्या दुकानात कामाला असून, रात्री जेव्हा ती घरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या अंगावर ओरखड्याचे व जखमांचे वण पाहून मातेने विचारणा केली असता, नऊ वर्षांच्या चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ‘आई, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. तुम्ही दोघं कामावर गेल्यावर आजोबा मला जबरदस्ती स्वतःकडे खेचायचे,’ असे चिमुरडीने रडत सांगितले. याआधी देखील असा प्रयत्न झाला होता, मात्र भीतीपोटी आणि कोणाशी संपर्क न झाल्याने हा प्रकार समोर आला नव्हता.
मीडियाशी बोलताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले. ‘ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाने माझ्या काळजाच्या तुकड्यावर नजर टाकली. अशा नराधमाला जगण्याचा अधिकार नाही,’ असे म्हणत तिने प्रशासनाकडे आपल्या बापाला कठोर शिक्षा म्हणजे फाशी देण्याची मागणी केली आहे. नात्यातील विश्वासाला तडा देणाऱ्या या कृतीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक असून, त्यांनी आरोपीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. साधारण वर्षभरापूर्वी मोबाइल चोरीच्या संशयावरून आरोपीला बाहेर काढले गेले होते. ‘सुरुवातीपासूनच ससऱ्याचे वर्तन संशयास्पद होते. मी पत्नीला स्पष्ट सांगितले होते की, तुला बाप हवा की संसार? तेव्हा तिने मुलांचा आणि संसाराचा विचार केला होता,’ असे वडिलांनी सांगितले. आरोपी त्याच परिसरात चोरून राहत होता आणि योग्य संधीची वाट पाहत होता, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास, जेव्हा मुलीचा भाऊ झोपलेला होता आणि आई-वडील कामावर होते, तेव्हा आरोपीने खाऊचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत ७० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. ‘कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांमुळे किंवा दगडफेकीमुळे तपासात अडथळा येऊ शकतो, त्यामुळे कायद्यावर विश्वास ठेवावा,’ असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











