महाराष्ट्र दिनानिमित्त असलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वाळूज औद्योगिक वसाहतीतून आलेल्या नऊ मित्रांच्या गटावर काळाने झडप घातली. टेंभापुरी मध्यम प्रकल्पात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांचा गाळात अडकून बुडून मृत्यू झाला.
शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर (रा. नांदेड) आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत.
१ मे रोजी ‘कामगार दिना’ची सुट्टी असल्याने वाळूजमध्ये राहणारे हे नऊ मित्र दुपारी दीडच्या सुमारास टेंभापुरी धरणावर आले होते. उन्हाचा तडाखा असल्याने तिघे जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि जमिनीखालील खोल खड्ड्यांत साचलेल्या गाळात अडकल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. इतर सहा मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत तिघेही बुडाले होते.
ग्रामस्थांच्या मते, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाल्यामुळे ठिकठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमध्ये गाळ साचला असून त्यात अडकून या तरुणांचा बळी गेला. अवघ्या पाच दिवसांपूर्वी, २६ एप्रिल रोजी याच ठिकाणी प्रिन्स श्रीसुंदर या १९ वर्षीय तरुणाचाही बुडून मृत्यू झाला होता. सलग होणाऱ्या या दुर्घटनांनंतरही प्रशासनाने कोणतीही सुरक्षात्मक पावले न उचलल्याने संताप व्यक्त होत आहे.











