May 15, 2026 6:04 am

तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’:- रामदास आठवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी आणि आंबेडकर चळवळीतील सर्व घटकांनी एकत्र यावे, यासाठी आंबेडकरी समाज आसुसलेला आहे. त्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र, एकत्रीकरण होणारच नसेल तर आपल्या पक्षाचा वेगाने विस्तार करणे हेच आपल्या समोरचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे, मोहन जगताप, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, शशिकला वाघमारे, प्रवीण ओव्हाळ, विशाल शेळके, राजेश गाडे, ऋषिकेश गवळी, संजय खडसे, सुनिल जाधव, सुधीर वाघमोडे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाज घटकांना एकत्र जोडणारा पक्ष आहे. पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा मुळे यांनी रिपब्लिकन पक्षात  प्रवेश केला असून; त्यांच्यावर पक्षाच्या मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मराठा आणि दलित समाजाला एकत्र जोडण्याचे पक्षाचे प्रयत्न असतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्योत्तर काळात समाजात उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे. संविधानामुळे समाज एकसंध राहिलेला आहे. त्यामुळेच भारतात नेपाळ किंवा बांगलादेशसारखी अराजकाची स्थिती केव्हाही निर्माण होऊ शकत नाही. मात्र, सामाजिक स्तरावर जातीभेद उठावदारपणे दिसत नसले तरी देखील अद्यापही काही ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिवर्तनासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.

आम्ही देशाभरात पक्षविस्तारासाठी प्रयत्नशील असलो तरीही महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, अशी खंत व्यक्त करताना आठवले यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध महामंडळामध्ये 50 सदस्य पक्षाला मिळावे, अशी आग्रही मागणी देखील आठवले यांनी केली.

पुणे येथील आंबेडकर भवन च्या पाठीमागची जागा स्मारकासाठी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी, कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाजवळ विजय स्मारकासाठी सरकारकडून 200 एकर जागा उपलब्ध व्हावी, अशा मागण्याही आठवले यांनी केल्या. विजय स्तंभाच्या जागेची पाहणी राज्याचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून झाली असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन स्मारकासाठी जागा अधिग्रहित करावी, असे आठवले यांनी सांगितले.

धम्मचक्र दिनी 14 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या सातारा येथून सामाजिक समरसता मार्च काढण्यात येणार असून तो महाराष्ट्रभर जाईल आणि त्याचा समारोप पुण्यात करण्यात येईल, असेही आठवले यांनी नमूद केले. सातारा येथे डॉ आंबेडकर यांच्या मातोश्रींचे स्मारक उभारले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. चवदार तळ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त पक्षाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता,’ या पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याने संतापलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी संपादकांना शिवीगाळ करून धमकीही दिली. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आठवले म्हणाले की, पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करताना प्रकाशकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?’ असा बदल करण्यास हरकत नव्हती. मात्र, संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

बाबा बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. धार्मिक गुरूंनी वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा समाजाचे प्रबोधन करावे. लोकांच्या जीवनामध्ये विधायक बदल कसे होतील, या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भोंदू अशोक खरात याचा भांडाफोड झाल्यानंतर अनेक भोंदू बाबांचे पितळ उघडे पडत आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्वच बुवा बाबांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!