जळगावमधून एक अतिशय भीषण आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने झालेल्या या कारअपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
दुर्दैवी गोष्ट म्हणजे या मृतांमध्ये, नुकतच लग्न झालेल्या एका नववधूचाही समावेश असल्याच माहिती समोर आली आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात च्या वापी येथून लग्नाचं वऱ्हाड घेऊन अकोला येथे ही क्रूझर कार जात होती. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराडखुर्द जवळ महामार्गावर असतानाच या धावत्या क्रूझर कारचं टायर अचानक फुटलं आणि ही कार त्या रोडलगत उभ्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. अतिशय भीषण अशी ही धडक होती. लग्न झाल्यानंतर नववधूला परत घेऊन येताना जळगाव मधील वराड गावाजवळ हा अपघात घडला आहे. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, जिचं नुकतंच लग्न झालं अशा नववधूचाही मृतांमध्ये समावेश असून त्यामुळे सगळेच हळहळले. नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे असून तिघेही एकच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात आणखी 6 जण जखमी असून लहान मुलाची प्रकृती गंभीर आहे.











