मुंबईतील भांडुप परिसरात गुरुवारी (दि.23) रात्री एका लग्न समारंभातील आनंदाचे वातावरण अचानक भीषण शोकांतिकेत बदलले. काका पेट्रोल पंपच्या मागे असलेल्या मातेश्वरी हॉलमध्ये लग्न सुरू असताना एका मुलीची छेड काढण्यावरून मोठा वाद निर्माण झाला.
छेड काढणाऱ्या अज्ञात मुलाला पकडण्यासाठी लग्नातील काही तरुण त्याच्या मागे धावले. पाठलाग करत असताना तो मुलगा श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या निर्माणाधीन इमारतीच्या तळमजल्यावर गेला. त्याला शोधण्यासाठी लग्नातील तरुण तिथे पोहोचले असता, तिथे लाकडी फळी आणि पत्र्याने झाकलेली एक निर्माणाधीन एसटीपी पाण्याची टाकी होती. अंधारात अंदाज न आल्याने एक तरुण आधी त्या खोल टाकीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर पाच नातेवाईक व तीन मजूर असे एकूण नऊ जण पत्रा तुटल्याने एकापाठोपाठ एक त्या टाकीत कोसळले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टाकीत पडलेल्या नऊ जणांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघातात 25 वर्षीय भालचंद्र गणेश पल्ले हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षुल्लक वादामुळे सुरू झालेला हा घटनाक्रम एका तरुणाच्या जीवावर बेतला असून, लग्नाच्या घरात आता शोककळा पसरली आहे.
जखमींची नावे खालील प्रमाणे –
1.अनिकेत महेश पाटील (वय 21 वर्ष किरकोळ जखमी)
2. श्रेयस संदीप सुर्वे (वय 25 वर्ष किरकोळ जखमी)
3. ऋषिकेश केशव कदम (वय 25 वर्ष किरकोळ जखमी)
4. भालचंद्र गणेश पल्ले (वय 25 वर्ष गंभीर जखमी फोर्टिस हॉस्पिटल येथे – मयत)
5. आदित्य शिवाजी आहेर (वय 25 वर्ष किरकोळ जखमी)
6. संकेत नामदेव जुवाटकर (वय 25 वर्ष किरकोळ जखमी)
7. जयदत्त पंचानंत शहा (वय 21 वर्ष बिल्डिंग कामगार किरकोळ जखमी)
8. अंकित कुमार रॉय (वय 19 वर्ष बिल्डिंग कामगार किरकोळ जखमी)
9 मजूर हरिशंकर पासवान, (वय 25 वर्षे जखमी – मुलुंड जनरल हॉस्पिटल)
मदत करण्यासाठी धाव घेतलेल्या तीन बांधकाम कामगारांचाही या दुर्घटनेत समावेश आहे. जयदत्त पंचानंत शहा, अंकित कुमार रॉय आणि हरिशंकर पासवान हे तिन्ही मजूर या अपघातात जखमी झाले असून, हरिशंकर पासवान यांना मुलुंड जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्थानिक शिवसेना (UBT) नेत्यांच्या म्हणण्यानुसार, हा संपूर्ण प्रकार संतापाच्या भरात आणि अंधारात रस्ता न समजल्यामुळे घडला आहे. निर्माणाधीन इमारतीमधील धोकादायक ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात इतका भीषण ठरल्याचे बोलले जात आहे.
भांडुप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मुलीची छेड काढणारा तो अज्ञात तरुण कोण होता आणि वादाचे नेमके स्वरूप काय होते, याचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून नऊ जणांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी भालचंद्र पल्ले या तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.










