पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील उरुळी कांचन पोलीस ठाणे हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलातून वगळून या स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती मोठ्या थाटामाटात करण्यात आली.
मात्र, आज दोन वर्षांनंतरही या पोलीस ठाण्याला स्वतःची हक्काची आणि पुरेशी जागा मिळालेली नाही. जागेअभावी पोलीस कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबना आता शिगेला पोहोचली असून, परिस्थिती इतकी गंभीर आहे की वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क बदलीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा विस्तार मोठा आहे. येथे 1 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. याशिवाय महिला व पुरुष कर्मचारी असा एकूण 50 ते 60 जणांचा मोठा स्टाफ या ठिकाणी अहोरात्र कार्यरत असतो. मात्र, इतक्या मोठ्या स्टाफला बसण्यासाठी साधी सन्मानजनक जागाही उपलब्ध नाही. एकावर एक कागदपत्रांचे ढिगारे आणि अपुऱ्या जागेत दाटीवाटीने काम करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी या पोलीस ठाण्यात स्वतंत्र कोठडी (जेल) उपलब्ध नाही. त्यामुळे आरोपींना सांभाळताना पोलिसांची मोठी कसरत होते. त्यामुळे पोलिसांना यवत अथवा दौंड पोलीस ठाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. अपघातातील जप्त केलेली वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने ही वाहने उघड्यावर अस्ताव्यस्त पडून आहेत. या विदारक चित्रामुळे पोलीस ठाणे आहे की भंगारवाडा? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
काम करण्याच्या ठिकाणची ही दुरवस्था पाहून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अनेक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी आता येथून पाय काढण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी “बसायला जागा नाही आणि सुविधा नाहीत, अशा ठिकाणी काम कसे करायचे?”असा सवाल करत बदलीसाठी वरिष्ठ पातळीवर अर्ज दिले आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे झाले तरी सुविधांच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने, गृह विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल उरुळी कांचनची जनता आणि येथील त्रस्त पोलीस विचारत आहेत.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.











