April 24, 2026 9:26 pm

नागपुरात हेलिपॅड असलेले २३ मजली प्रशस्त रुग्णालय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मध्य भारतातील रुग्णांना आता गंभीर आजारांच्या निदान व उपचारासाठी भटकंती करावी लागणार नाही. शहरात लवकरच अत्याधुनिक, सर्वसमावेशक मल्टी-स्पेशालिटी व सुपर-स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार असून, सर्व निदान व उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी या रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले. नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्गावर २३ मजली या इमारतीच्या छतावर हेलिपॅड असणार आहे.

डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था, नागपूर यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. सुनील मनोहर, अजय संचेती, शैलेश जोगळेकर, भैय्याजी जोशी, डॉ. आनंद पाठक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शैलेश जोगळेकर यांनी रुग्णालयातील सुविधांबाबत सादरीकरण केले. त्यांच्या माहितीनुसार, ४५० खाटांच्या या रुग्णालयासाठी सुमारे ५ लाख चौरस फूट बांधकाम होणार आहे. रुग्णालयाच्या तळभागात तीन मजल्यांचे प्रशस्त वाहनतळ असेल. त्यावर १८ मजल्यांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. इमारतीच्या छतावर मोठे हेलिपॅड असणार असून, अशी सुविधा असलेले हे मध्य भारतातील पहिलेच रुग्णालय ठरणार आहे.

या रुग्णालयात महिला व बालकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. मध्य भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या सिकल सेल आजाराच्या रुग्णांसाठीही येथे सर्वसमावेशक उपचार व्यवस्था असेल. तसेच मेंदूरोग, हृदयरोग, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आदी महत्त्वाचे विभागही येथे असतील. अपघातग्रस्त रुग्णांसाठी ट्रॉमा केअर सेंटर, जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग, तसेच वंधत्वावरील उपचारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध असतील. रुग्णालयात तीन मजल्यांवर प्रशस्त बाह्यरुग्ण विभाग असेल. खासगी कक्षांसोबतच सामान्य रुग्णांसाठी माफक दरात उपचार मिळावेत यासाठी स्वतंत्र सामान्य वॉर्डही असतील. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रशस्त प्रतीक्षालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रुग्णालयात किरकोळ तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र व सुसज्ज ऑपरेशन थिएटर असतील. अवयव प्रत्यारोपणासाठी विशेष सुविधा उपलब्ध असेल. तसेच किरकोळ शस्त्रक्रिया करून त्याच दिवशी रुग्णांना घरी पाठविण्यासाठी डे-केअर सेंटरची सोय असेल. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णखाटांचा एक मजलाही राखीव असेल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!