राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज बारामतीत बोलताना अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचे प्रकार घडत असून, या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
मिटकरी यांनी आरोप केला की, “काटेवाडी येथील दादांच्या बंगल्याबाहेर एक बोकड टाकण्यात आले होते. 19 जानेवारी रोजी पहाटेच्या एक वाजून 21 मिनिटांपर्यंत अमावस्या होती त्यादरम्यान बोकड उलट टांगून त्याचे मस्तक कापले होते. आज आपण त्या ठिकाणी गेलो आजही ते बोकड त्या ठिकाणी असून, इतक्या दिवसानंतर ही त्याची दुर्गंधी सुटलेली नाही.. हे कसे काय?
२८ डिसेंबरला एआय (AI) इमारतीच्या उद्घाटनावेळी दोन बाहुल्या टाकल्या होत्या, तर १९ जानेवारीला पुन्हा एकदा पूजा केली गेली. हे सर्व अघोरी पूजेचे प्रकार आहेत. पहिल्यांदा पशुबळी दिला जातो आणि त्यानंतर नरबळी दिला जातो, अशी भीती वाटते. घराच्या अंगणात रक्ताचे अभिषेक झाले आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.”
अजित पवारांसारखा विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस अशा भंपक गोष्टींना बळी कसा पडला, असा प्रश्न उपस्थित करत मिटकरी म्हणाले की, बाहेरचे लोक इथल्या स्थानिक लोकांचा आधार घेऊन ही पूजा करत होते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामतीतलेच कोणीतरी यांना सामील असावेत. त्याखेरीज हे शक्य नाही. बारामतीतील ‘सहयोग’ आणि ‘काटेवाडी’ येथे अभिषेक करणारी लोकं कोण आहेत, हे एसआयटीने शोधून काढावे. बारामतीतील कोण बोटं कापून घेण्यासाठी अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरात अघोरी विधीसाठी जात होते ते देखील तपासले पाहिजे.










