July 25, 2026 11:50 am

पुण्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ; घोरपडे पेठ आणि लोहियानगरमध्ये दोन घटना, सहा राऊंड फायर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें
एक जण जखमी, चार आरोपी ताब्यात; दुसऱ्या घटनेतील आरोपी अल्पवयीन, खडक पोलिसांचा तपास सुरू
पुणे, दि. २५ : पुणे शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी (दि. २४) भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागातील घोरपडे पेठ आणि लोहियानगर परिसरात अवघ्या काही तासांच्या अंतराने गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे यापैकी एक घटना पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडली. दोन्ही घटनांमध्ये मिळून सहा राऊंड गोळीबार करण्यात आला असून, पहिल्या घटनेत एका तरुणाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या घटनेत हवेत गोळीबार करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खडक पोलिसांनी पहिल्या घटनेप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेतील गोळीबार करणारे आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला ते सर्व अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घोरपडे पेठेत जुन्या वैमनस्यातून गोळीबार पहिली घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठेतील अनुसया टॉवर्ससमोर घडली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव ख्वाजा उद्दीन नशीर शेख (वय २८, रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) असे आहे. या प्रकरणी त्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सोनू उर्फ मोंटू अनिल परदेशी (२७), पियूष उर्फ जय अनिल परदेशी (२५), सुजल सुनील परदेशी (२२) आणि नितेश रिकब (२२, सर्व रा. काशेवाडी, घोरपडे पेठ) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, सर्वांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००५ मधील खुनाच्या घटनेचा सूड? पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शेख आणि परदेशी कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून वैमनस्य आहे. सन २००५ मध्ये ख्वाजा शेख यांच्या चुलत्याने आरोपी सोनू परदेशी याचे वडील अनिल परदेशी यांचा खून केला होता. त्याच घटनेच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ख्वाजा शेख हे शुक्रवारी सकाळी एका नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी मोमीनपुरा कब्रस्तान येथे गेले होते. तेथून नातेवाईकांच्या घरी जात असताना आरोपी त्यांचा पाठलाग करत होते. अनुसया टॉवर्ससमोर त्यांना अडवून “तुझ्या नातेवाइकांनी माझ्या वडिलांचा खून केला होता, आता तुलाही संपवतो,” अशी धमकी देत आरोपी सोनू परदेशी याने पिस्तूलातून गोळीबार केला. तीन राऊंड फायर, एक गोळी पाठीत सोनू परदेशी याने केलेल्या गोळीबारातील एक गोळी ख्वाजा शेख यांच्या पाठीत लागली. त्याचवेळी आरोपी पियूष परदेशी यानेही पिस्तूलातून गोळी झाडली. तसेच आणखी एक गोळी हवेत झाडण्यात आली. अशा प्रकारे आरोपींकडून एकूण तीन राऊंड फायर करण्यात आले. गोळी लागूनही प्रसंगावधान राखत ख्वाजा शेख यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. लोहियानगरमध्ये संध्याकाळी पुन्हा गोळीबार पहिल्या घटनेचा तपास सुरू असतानाच सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान लोहियानगर येथील पीएमसी कॉलनी क्रमांक ९ परिसरात आणखी एक गोळीबाराची घटना घडली. पूर्वीच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात गोळीबार करणारे आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला ते सर्व अल्पवयीन असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीने हवेत सलग तीन राऊंड गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव दोन्ही घटनांची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे तसेच खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. पहिल्या घटनेतील आरोपी ताब्यात, दुसऱ्या प्रकरणाचा तपास सुरू वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, दोन्ही गोळीबाराच्या घटना पूर्वीच्या वादातून घडल्या आहेत. पहिल्या प्रकरणातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी हवेत तीन राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. त्या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून, पुढील तपास सुरू आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह एकाच दिवशी, एकाच पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि त्यातही भरदिवसा दोन स्वतंत्र गोळीबाराच्या घटना घडल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सर्रास शस्त्रांचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. खडक पोलिसांकडून दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!