उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कॅलिफोर्नियातील नामांकित बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेणारा भारतीयविद्यार्थी श्रीनिवासैया गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे.
या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात चिंतेचे वातावरण असून, भारतात त्याच्या कुटुंबाची अन् मित्रपरिवाराची अवस्था बिकट झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला आहे.
कोण आहे श्रीनिवासैया?
मूळचा बेंगळुरूचा रहिवासी असलेला श्रीनिवासैया अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याने बेंगळुरूच्या श्री वाणी एज्युकेशन सेंटरमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने देशातील नामांकित आयआयटी मद्रासमधून पदवी संपादन केली आणि पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. सहा फूट उंच आणि सुदृढ शरीरयष्टी असलेल्या श्रीनिवासैयाच्या ओळखीच्या लोकांनी त्याला ब्रिलियंट आणि अत्यंत नम्र स्वभावाचा तरुण असल्याचे म्हटले आहे.
पाचव्या दिवशीही शोध सुरू; सोशल मीडियावर मदतीचा ओघ
श्रीनिवासैया बेपत्ता होऊन आज पाच दिवस उलटले आहेत, तरीही त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. स्थानिक पोलिसांसोबतच आता तिथले नागरिकही शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. ‘रेडिट’सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या शोधासाठी खास थ्रेड बनवण्यात आले आहेत. लेक अंजा परिसरात बोटींच्या सहाय्याने मोठी शोधमोहीम राबवली जात आहे. काही स्वयंसेवक आपल्या शिकारी कुत्र्यांच्या सहाय्याने जंगलात आणि परिसरात त्याचा शोध घेत आहेत.
संसदेत गदारोळ: ओवैसींचा सरकारला जाब
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला प्रश्न विचारला की, परदेशात शिकणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय पावले उचलली जात आहेत? यावर परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले की, “भारतीय दूतावास आणि मिशन परदेशातील विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असतात. त्यांना वेळोवेळी संकटांची जाणीव करून देण्यासाठी ओरिएंटेशन सेशन आणि ॲडव्हायझरी जारी केली जाते.”
चिंता वाढली!
लिंक्डइनवर श्रीनिवासैयाच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कामाचे आणि स्वभावाचे मोठे कौतुक केले आहे. मात्र, इतका हुशार आणि जबाबदार मुलगा अचानक गायब कसा झाला, याचे गूढ अद्याप उकललेले नाही. अमेरिकेतील पोलीस तपास करत असले तरी पाच दिवस उलटल्याने आता घातपाताची शक्यता किंवा इतर संकटांची भीती व्यक्त केली जात आहे.











