वसई परिसरात अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर अजीव पाटील यांनी दिला असून शहरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच आपण सुंदर आणि सुरक्षित वसई-विरारची निर्मिती करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत महापौरांनी प्रशासनाला कड़क निर्देश दिले. बैठकीनंतर महापालिकेच्या स्वच्छतादूतांना स्मार्ट वॉचचे वाटप करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी शहरवासीयांना दिलेली विकासकामांची वचने प्रत्यक्षात आणण्यासाठी या बैठकीत सविस्तर विचारविनिमय झाला.
शहरात आकारास येत असलेल्या दिव्यांग व संविधान पार्क या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांच्या कामाची गती महापौरांनी तपासली. नारिंगी पापडखिंड येथील प्रस्तावित बर्ड पार्कच्या मार्गातील वनविभागाच्या परवानग्या व इतर तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले, जीवदानी मंदिर पायथ्याशी असलेले क्रिकेट मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आली.
या बैठकीला उपमहापौर मार्शल लोपीस्, नगरसेवक प्रवीण शेट्टी, प्रफुल्ल साने, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत यांच्यासह सर्व विभागांचे उपायुक्त व महापालिका अधिकारी उपस्थित होते. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापौरांनी आस्थेटिक इमाव्हमेंट स्कीम राबवण्यावर भर दिला आहे. मुबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक परिसरातील शंभर मीटरचा भाग फेरीवालामुक्त व मोकळा करण्याबाबात त्याच्या कडक सूचना आहेत. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, रिक्षाचालक, फेरीवाले आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापौर पाटील यानी केले.
वसई-आचोळे येथील चारशे खाटांचे रुग्णालय आणि नालासोपारा रुग्णालयातील विस्तारीकरण तातडीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला, शहरातील सात उडाणपूल, एमएमआरडीएचे तेरा रस्ते आणि २०१५ पासून प्रलंबित असलेल्या रिंगरूटचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले.परिवहन सेवेसाठी मुंबई वन अॅपचा वापर असेल. दमणच्या धर्तीवर वसईतील राजोडी, कळंब, अर्नाळा आणि वसई किनाऱ्यांचा कायापालट करणार आहेत. महापालिका इमारतीचा वीज खर्च वाचवण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प असेल.











