पाणीपुरी हा अनेकांचा अत्यंत आवडीचा पदार्थ. स्वस्त दर आणि कुठेही सहज असलेला हा पदार्थ असल्यामुळे लोक आवडीने पाणीपुरी खातात. पण, अलीकडच्या काळात समाजमाध्यमांवर पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करण्यापासून पाणीपुरी बनवण्यापर्यंत अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामुळे खवय्यांची पूर्ती झोप उडाली आहे.
असाच एक धक्कादायक प्रकार विरारमध्ये देखील घडला आहे. विरारमधील पाणीपुरीच्या गाडीवरचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.
वसई विरार शहरात अन्न सुरक्षेच्या संदर्भात एकापाठोपाठ एक घटना समोर येत असतात. नुकताच विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्रीच्या गाड्यावर हिरव्या रंगाचा साप आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साप आढळून आल्याने नागरिक व ग्राहकांमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकारचा व्हिडीओ ही समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागला आहे.
पाणीपुरीच्या गाडीवर घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याची पद्धत यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.
या घटनेनंतर “रस्त्यावरील पाणीपुरी खाणे खरंच सुरक्षित आहे का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने अशा पाणीपुरी विक्री ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच विक्रेत्यांना स्वच्छतेबाबत कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, नागरिकांनीही रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता, पाणी आणि परिसराची स्थिती पाहूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
फळे धुण्यासाठी गटाराच्या पाण्याचा वापर
पाणीपुरीच्या गाडीवर साप आढळ्याचा व्हिडिओ जारी आता व्हायरल होत असला तरी यापूर्वी फळांच्या गाडीवरून विरारमधील उच्चभ्रू वसाहतीत घरोघरी जाऊन फळांची विक्री करणारा एक विक्रेता चक्क गटाराच्या पाण्याचा वापर ती विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांकडून फळे खरेदी करणे कितपत योग्य आहे? असा सवाल नेटकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रस्त्यावरील उघडे, निकृष्ट दर्जाचे आणि अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले अन्न, तसेच पुन्हा पुन्हा वापरलेले तेल यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि अन्नातून विषबाधा यांसारखे आजार वाढू शकतात. तर पाणीपुरीसारख्या पदार्थांमध्ये आढळणारे जीवजंतू आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.











