काही वर्षांपूर्वी खोकला वर्षातून एकदा यायचा. औषधोपचार घेतले की, चार-पाच दिवसांत बरा व्हायचा. आता औषधोपचार घेऊनही खोकला बरा होत नाही. तसेच वर्षातून अनेकदा खोकला लागत आहे. प्रदूषण आणि प्रतिजैविकांची वाढलेली मात्रा हेच खोकला लवकर बरा न होण्यामागचे कारण आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी ढगाळ तर, कधी कडक ऊन याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. खोकला येण्याचा आणि प्रदूषणाचा काळ हा एकाचवेळी आल्याने खोकला बरा होण्यास अडचणी येत आहेत.
जंतूंचा संसर्ग वाढला आहे. लोक बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जातात, तिथे मास्क वापरत नाहीत. बाहेर लोक शिंकताना तोंडावर हातरुमाल वापरत नाहीत. याचवेळी बाहेरचे खाणे-पिणे होते. अनेकदा कोंदट ठिकाणी राहणे, हे खोकला सतत येण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
मेडिकलमध्ये जाऊन स्वत:च गोळ्या घेणे, ‘ॲजिथ्रोमायसिन’ किंवा वारंवार प्रतिजैविके घेण्यामुळे जंतू निर्ढावले आहेत. वारंवार प्रतिजैविके घेतल्यामुळे आता जास्त ताकदीची आणि महाग औषधे घ्यावी लागत आहेत.
परदेशात कुठल्याही सिद्धतेशिवाय प्रतिजैविके दिली जात नाहीत. तिथे प्रतिजैविकांचा वापर संयमाने होत आहे. आपल्याकडे धर नाही. शरीरावर सतत प्रतिजैविकांचा वापर होत असल्याने जंतूंची प्रतिकार शक्ती वाढत आहे. जंतू निर्ढावले आहेत. प्रतिजैविके खाल्ल्यानंतरही प्रतिकार होत आहे. या गोष्टींचा रुग्णांनी विचार करायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते..
मधुमेह, कर्करोग, श्वसनविकार, अर्धांगवायू, स्थूलपणा, हृदयरोग, संधिवात असलेल्या रुग्णांना अधिकची औषधे घ्यावी लागत आहेत. यातच त्यांना खोकला लागल्यास अधिक त्रास होऊ शकतो. अशावेळी एकतर त्यांना ॲडमिट करावे लागते किंवा महागडी इंजेक्शन घेण्याची वेळ येते.
खोकला झाल्यानंतर प्रदूषणामुळे श्वसनमार्ग खरवडतो. जखम झाल्याने लवकर पुनर्प्राप्ती होत नाही. तसेच व्हायरसचे व्हेरिएंटदेखील शून्यांवर जात नाही. लोकांच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. रात्री उशिरा जेवण केल्याने जठरातील पित्त अन्ननलिकेतून घशात येते. त्यामुळे सूर्य मावळतेवेळी जेवण करा आणि अडीच तासानंतर झोप घ्या. रात्रीच्या जेवणात पित्त निर्माण करणारे पदार्थ असू नयेत.
घराच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवणे, मच्छर कॉईल, परफ्युम वापरू नये. त्याचे इन्फेक्शन झाले, तर रिकव्हरीला वेळ लागतो. त्यासोबतच धूर, दमट हवा, घाण, धूळ, सुगंधी फुले सतत जवळ असू नयेत. वीटभट्टी, साखर कारखाना परिसरातील प्रदूषणातून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमध्ये जाऊन प्रतिजैविकांची मात्रा घेणे, त्यामुळे जंतूदेखील निर्ढावले आहेत. जंतूंची रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे. ‘सेल्फ मेडिकेशन’ हा खोकला कायम राहण्यास कारणीभूत आहे. ताकदीच्या आणि महाग प्रतिजैविकांमुळे शरीराचे नुकसान होत आहे. परदेशात कुठल्याही सिद्धतेशिवाय प्रतिजैविके दिली जात नाही.











