April 23, 2026 3:44 pm

*कॅम्प ४ मध्ये पाणीटंचाईचा उद्रेक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरात सलग पाच दिवस पाणी नसल्याने एक ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अर्धनग्न होऊन रस्त्यावर उतरतो आणि त्याच वेळी महापालिकेच्या निष्काळजीमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाते.

हा विरोधाभास उल्हासनगरच्या पाणी व्यवस्थेचे भयावह वास्तव समोर आणणारा ठरला आहे. कॅम्प नंबर चारमधील पाणीटंचाई आणि कैलास कॉलनीतील जलवाहिनी फुटीमुळे शहरवासीयांचा संताप अनावर झाला आहे.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. या त्रासाला कंटाळून राजाराम शंकर पवार (६८) या ज्येष्ठ नागरिकाने थेट पाणीपुरवठा कार्यालय गाठले आणि अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केले. शनिवारपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवतोय; पण प्रशासनाला पाझर फुटत नाहीये, अशा शब्दांत पवार यांनी आपली व्यथा मांडली. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

एकीकडे नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरले असतानाच, बुधवारी (ता. ४) रात्री कैलास कॉलनी परिसरात रस्त्याच्या खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून गेले. पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता, की परिसरात पाणी साचून वाहतूक विस्कळित झाली. खबरदारी म्हणून पाणीपुरवठा बंद करावा लागल्याने, टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.

नियोजनाचा अभाव की अनास्था?

माणूस पाण्यासाठी अर्धनग्न होतो आणि प्रशासन मात्र पाण्याची नासाडी उघड्या डोळ्यांनी पाहते, हे शहराचे दुर्दैव आहे, अशा शब्दांत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. विनानियोजन सुरू असलेली खोदकामे आणि तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप होत आहे. महापालिकेकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर केवळ आश्वासने नको, तर पाणीपुरवठ्याचे कायमस्वरूपी नियोजन करा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!