नवी दिल्ली | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील नेतृत्व, पदे आणि निर्णयप्रक्रियेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “पक्षातील कोणतेही पद माझ्यासाठी नाही. मी कुठेही राहणार नाही, हे मी अगदी स्पष्ट सांगतो. योग्य व्यक्तीकडे योग्य जबाबदारी देणे आणि अजित दादांनंतरची संपूर्ण ट्रान्झिशन प्रक्रिया नीट पार पाडणे, हीच माझी जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने ही जबाबदारी पार पाडत आहे. अजित दादांनंतर कोण कुठे, कसे, कोणत्या भूमिकेत असेल याची प्रक्रिया योग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच मी समोर दिसतो.” पक्षातील निर्णय बाहेरच्यांनी ठरवायचे नसतात, हे ठामपणे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “आमच्या पक्षाचा विधिमंडळ नेता कोण, पक्षाध्यक्ष कोण असणार – हे राज ठाकरे, अन्य कोणताही नेता किंवा कुठलीही बुलेटीन ठरवणार नाही. आमच्या पक्षाचे आमदार, पदाधिकारी आणि संघटनाच हे निर्णय घेईल.” विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “सध्या विलिनीकरण हा विषय आमच्या अजेंड्यावर नाही. आधी आमच्या पक्षाचे घर, विधिमंडळ आणि संघटनात्मक बाबी व्यवस्थित सेटल करणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यानंतरच इतर कोणतेही विषय चर्चेला येतील.” ते पुढे म्हणाले, “सर्वप्रथम विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे. आता पुढील टप्प्यात पक्षातील निर्णयप्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली जाईल. मात्र या प्रक्रियेत असताना काही लोक जाणूनबुजून उलटसुलट बातम्या पसरवत आहेत. कोणाचेही नाव विनाकारण पुढे आणले जात आहे. या सर्व बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.” राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. “मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित दादा गटातील एकाही नेत्याने माझे नाव पुढे केलेले नाही. राष्ट्रीय अध्यक्षाचा निर्णय हा पक्षाच्या बैठकीत, विधिमंडळ, पदाधिकारी आणि जनभावना यांचा विचार करून घेतला जाईल.” सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, “आमच्या मनामध्ये सुनेत्रा ताईंबद्दल अपार आदर आहे. अजित दादांच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्या कुटुंबाची, विशेषतः त्यांच्या पत्नीची मोठी भूमिका राहिली आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल आमच्या मनात प्रेम आणि सन्मान आहे आणि तो आम्ही आमच्या कृतीतून दाखवू.” शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती का, या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आज मी केवळ आमच्या सध्याच्या पक्षाबाबत बोलेन. काल्पनिक किंवा पुढच्या टप्प्यातील विषयांवर चर्चा करणे सध्या योग्य नाही. अजित दादांनी स्वतः दिलेल्या मुलाखतींमध्ये अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत माहिती देताना ते म्हणाले, “मागील निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही भाजपसोबत, काही ठिकाणी शिंदे गटासोबत लढलो. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतविभाजन होऊ नये, एवढ्यापुरतीच चर्चा झाली होती. त्यापलीकडे कोणताही प्रस्ताव सध्या नाही.” शेवटी प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत आवाहन केले की, “आमच्या पक्षाचे अंतर्गत विषय आधी आम्हाला सेटल करू द्या. कोणालाही संशय, किंतु-परंतु किंवा शंका घेण्याची गरज राहणार नाही, अशा पद्धतीने आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू.”











