महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातात पायलट टीमचा भाग असलेल्या २५ वर्षीय कॅप्टन शांभवी पाठक यांचाही अंत झाला असून, त्यांच्या अकाली जाण्याने दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबईहून उड्डाण केल्यानंतर लँडिंगच्या काही मिनिटे आधीच ‘VSR Ventures’च्या Learjet 45 या विमानाचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला.
आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर
अपघाताची बातमी मिळताच शांभवीचे वडील, जे स्वतः निवृत्त लष्करी पायलट आहेत, ते तात्काळ पुण्याकडे रवाना झाले.
शांभवीची आई दिल्लीतील एअर फोर्स बाल भारती स्कूलमध्ये शिक्षिका असून, लेकीच्या मृत्यूने त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत. ज्या आईच्या डोळ्यांत मुलीच्या लग्नाची स्वप्नं होती, त्याच आईला आता तिच्या पार्थिवाची वाट पाहावी लागत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, कुटुंबात शांभवीच्या लग्नाविषयी चर्चा सुरू होत्या. तिचा २२ वर्षीय धाकटा भाऊ अद्याप शिक्षण घेत आहे.
परिसरातील आठवणी : “अत्यंत साधी आणि संवेदनशील”
शेजारी राहणाऱ्या शिल्पी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले,
“शांभवी खूप साधी, शांत आणि गोड स्वभावाची होती. दीड महिन्यापूर्वी ती शेवटची माझ्या पार्लरमध्ये आली होती. तिच्या आईने लग्नासाठी स्थळ पाहण्याचा विचार सुरू केला होता. इतकं भावनिक नातं होतं की मी माझ्या कॅनडात राहणाऱ्या मुलासाठीही तिचा विचार केला होता.”
परिसरात गेली चार दशके सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र म्हणाले,
“ती मला नेहमी नमस्कार करायची. हे कुटुंब सगळ्यांशी सन्मानाने वागायचं.”
वडिलांची गाडी धुणाऱ्या व्यक्तीनेही शांभवी ही अत्यंत संवेदनशील आणि मनमिळाऊ असल्याचे सांगितले.
मेहनतीने गाठलेले यशाचे शिखर
शांभवी पाठक २०२२ पासून VSR Venturesमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत होती.
तिने –
एअर फोर्स बाल भारती स्कूलमधून शालेय शिक्षण
न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक उड्डाण प्रशिक्षण
कमर्शियल पायलट लायसन्स (CPL)
फ्रोजन ATPL व इतर आंतरराष्ट्रीय विमान प्रमाणपत्रे
मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्समध्ये B.Sc.
अत्यंत कमी वयात मेहनतीच्या जोरावर तिने आकाशाला गवसणी घातली होती.
अकाली अस्त… परिसरात शोककळा
एका उज्ज्वल कारकिर्दीची, स्वप्नांनी भरलेल्या आयुष्याची अशी अचानक झालेली सांगता संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे.
शांभवी पाठक यांच्या निधनाने केवळ एक कुशल पायलटच नाही, तर एक संवेदनशील, कर्तृत्ववान तरुणी देशाने गमावली आहे.











