राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार असल्याची घोषणा राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे.
राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी आतापर्यंत १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन अर्जांची मुदत अद्याप सुरू असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा राज्यातील ५ हजार १११ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही परीक्षा ३ हजार ३८७ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. अशा प्रकारे यंदा दहावी–बारावीच्या परीक्षांना मिळून ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत.
परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त करण्यावर भर
परीक्षा भयमुक्त, पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी यंदा कडक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले. राज्यातील सुमारे ८० टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, उर्वरित केंद्रांवर तातडीने कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कंट्रोल रूमद्वारे थेट देखरेख ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, जिल्हास्तर व राज्यस्तरावर दक्षता समित्या कार्यरत राहून परीक्षेवर लक्ष ठेवणार आहेत.
गैरप्रकारांवर कडक कारवाईचा इशारा
मागील वर्षी बारावीच्या ७६ आणि दहावीच्या ३१ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आल्याने त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती. यंदाही अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रांची तात्काळ मान्यता रद्द करण्यात येईल, असा कडक इशाराही शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रम
दरम्यान, येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये “राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायतीचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमात राज्यातील सुमारे १ लाख शाळा, ७ लाखांहून अधिक शिक्षक आणि जवळपास २ कोटी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शासकीय ध्वजवंदनानंतर किमान २० मिनिटांचा सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या वेळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर उपस्थित होते.











