July 26, 2026 7:55 pm

दहावीतील २१ टॉपर विद्यार्थ्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गौरव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान; गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड : दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या शाळेसह आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणाऱ्या २१ गुणवंत आणि टॉपर विद्यार्थ्यांचा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य आणि संहिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद अविस्मरणीय करण्यासाठी त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीच्या शालेय वातावरणापेक्षा वेगळ्या आणि प्रतिष्ठित ठिकाणी झालेल्या या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीची दखल घेतली जात असल्याची तसेच आत्मसन्मानाची अनोखी अनुभूती मिळाली.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे, मावळचे गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) कुलदीप प्रधान, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब काळे तसेच उद्योजक अमित शेठ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद आणि भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याचा आत्मविश्वास दिसून येत होता.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त गणेश इंगळे म्हणाले, “नोकरी मिळवणे हे अंतिम ध्येय नसून, मिळालेल्या पदाचा उपयोग प्रामाणिकपणे जनसेवा आणि राष्ट्रसेवेसाठी करणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजाकडून घेण्यापेक्षा समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती प्रत्येक तरुणाने जोपासली पाहिजे. प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच होते.”

गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करताना सांगितले की, “यश हे नशिबाने नव्हे, तर जिद्द, शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रमाने मिळते. नियमित अभ्यास, उजळणी आणि वेळेचे नियोजन यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते.”

शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश दिला. ते म्हणाले, “मोठी स्वप्ने पाहा, त्यांना कृतीची जोड द्या आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून सातत्याने प्रयत्न करा. योग्य निर्णय, आत्मविश्वास आणि परिश्रम यांच्या जोरावर प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरते.”

सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्ट, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष दिपक हरिभाऊ चौघुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “विचार मोठे ठेवा, स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अखंड प्रयत्न करा. निश्चितच यश तुमच्या पावलांशी येईल,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

दहावीतील यश हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला, तरी हा शेवट नसून उज्ज्वल भविष्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. या २१ गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठीदेखील प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास व सातत्यपूर्ण परिश्रम असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे योगेश रोहिदास शेवाळे, कुलदीप हरिश्चंद्र नाईकनवरे, सारिका संतोष लोणकर, पद्माजा गणेश गव्हाणे, आकाश भारत झांबरे, सागर नंदकुमार जगताप, राहुल नाईक सागर करंडे आणि श्रेयस दिपक चौघुले यांनी विशेष परिश्रम घेतले.

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि फाईव्ह स्टार हॉटेलमधील भोजनाचा अनोखा अनुभव यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित पालक, शिक्षक आणि नागरिकांनी कौतुक केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!