पुणे प्रतिनिधी – ज्योतिबा सावंत
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त राज्यभर वर्षभर चालणाऱ्या वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची व्यापक रूपरेषा निश्चित करण्यासाठी नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माजी. सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख , राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे आणि राज्याध्यक्ष राजा कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही शताब्दी केवळ औपचारिक स्मरणापुरती मर्यादित न ठेवता, नव्या पिढीत फुले विचार रुजवणारी सशक्त सामाजिक चळवळ म्हणून साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यासाठी ‘विचारातून संघटन, संघटनातून परिवर्तन’ ही वर्षभराची मध्यवर्ती संकल्पना (Theme) निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
100 शाळा – 100 कॉलेजमध्ये फुले विचार बुक क्लब
राज्यातील 100 शाळा आणि 100 महाविद्यालयांमध्ये ‘ बुक क्लब व सांस्कृतिक मंच’ स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे नेतृत्व राजा कांदळकर करणार असून, प्रत्येक शाळा व महाविद्यालयातून एक प्रतिनिधी असलेला स्वतंत्र समन्वय गट तयार केला जाणार आहे. या संस्थांना त्यांच्या पातळीवर स्वातंत्र्याने उपक्रमांची रूपरेषा ठरवण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.
शिक्षण, सामाजिक समता आणि त्यातही स्त्री–पुरुष समता, सर्वधर्मसमभाव.
महात्मा फुलेंच्या कार्याचा केंद्रबिंदू असलेल्या शिक्षण, सर्वधर्मसमभाव तसेच सामाजिक समता आणि त्यातही स्त्री–पुरुष समता या तीन प्रमुख विषयांवर आधारित उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत. स्त्री शिक्षण, युवक संवाद, संविधान मूल्ये आणि समतावादी समाजनिर्मिती यावर विशेष भर देण्यात येईल.
राष्ट्र सेवा दल कला पथकाची उभारणी
मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आदी शहरांमध्ये राष्ट्र सेवा दलाचे स्वतंत्र कला पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या पथकांमध्ये तरुण पुरोगामी गायक, वादक, कवी व लोककवी यांना संधी दिली जाणार असून, सोशल मीडिया, महाविद्यालये व सांस्कृतिक मंचांद्वारे त्यांचा शोध घेतला जाणार आहे. निवड झालेल्या कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.
वैचारिक शिबिरे, साहित्य संमेलन व विशेष सहकार्य
राष्ट्र सेवा दल व आंतर भारतीच्या शाखा असलेल्या जिल्ह्यांमध्ये युवक–युवतींसाठी दोन दिवसांची वैचारिक शिबिरे घेण्यात येणार आहेत. पुण्यात महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या संयोजनात फुले विचार साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या तलाकशुदा महिलांच्या भारतातील पहिल्या मोर्चाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सहकार्य करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. महाड सत्याग्रह शताब्दी वर्षाचा प्रारंभ 20 मार्च 2026 पासून करण्यात येणार असून, त्या निमित्त सामाजिक हक्क व सार्वजनिक संसाधनांवर आधारित विशेष संकल्पनेतून उपक्रम राबवले जाणार आहेत.
तरुणाईसाठी डिजिटल व्यासपीठ
तरुण पिढीपर्यंत पुरोगामी विचार पोहोचवण्यासाठी स्वतंत्र YouTube चॅनेल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी राष्ट्र सेवा दल वैचारिक मार्गदर्शन, वक्ते व कार्यकर्ते उपलब्ध करून देणार असून, एक समर्पित सोशल मीडिया समन्वयक नेमण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
पुणे–मुंबईतून राज्यव्यापी विस्तार
मनुष्यबळ, वेळ व साधनांच्या मर्यादा लक्षात घेता, सुरुवातीला पुणे व मुंबई येथे विशेष कार्यक्रमांद्वारे उपक्रमांची सुरुवात करून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विविध संस्थांचा सहभाग
या बैठकीला 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, माजी. सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण देशमुख,
गणेश चिंचोले,लेखक,पत्रकार मिलिंद चंपानेरकर, PUCLचे जी. डी. पारेख व अनघा लेले, शिक्षण हक्क सभेचे शरद जावडेकर, डॉ. डी. एस. कोरे, कलीम अजीम , सविता कुरुंदवाडे (आंतर भारती ट्रस्ट), वर्षा गुप्ते (समाजवादी महिला सभा, आरोग्य सेना), अॅड. शारदा वाडेकर, अॅड. दत्ता काळेबेरे (महात्मा फुले समता प्रतिष्ठान), अर्चना झेंडे (मिळून सार्याजणी मासिक), उमेश चव्हाण, अपर्णा साठे, हृदयमानव अशोक, तेजस्विनी सचिन ढोबळे ( रुग्ण हक्क परिषद ), डॉ. समशुद्दीन तांबोळी (मुस्लिम सत्यशोधक मंडळ), संतोष लालवानी (पर्यावरण तज्ञ) आदी मान्यवर सहभागी झाले होते. सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महात्मा फुले द्विजन्म शताब्दी वर्ष हे केवळ स्मरणाचे नव्हे, तर नव्या सत्यशोधकांची पिढी घडवण्याचे वर्ष ठरेल, असा ठाम विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.
अभिजीत आंब्रे
राष्ट्रीय संपर्क सचिव,
राष्ट्र सेवा दल.











