पुणे प्रतिनिधी : ज्योतिबा सावंत
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, विशेषतः शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यभरात वर्चस्व सिद्ध करत 1425 नगरसेवक निवडून आणले आहेत. काँग्रेसने “संपली” अशी चर्चा असतानाही 324 नगरसेवक निवडून आणत अस्तित्व कायम राखले आहे. दुसरीकडे, राज्यात अजूनही पूर्णपणे प्रस्थापित नसलेल्या AIMIM ने 126 नगरसेवकांची मजल मारली आहे. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 36 नगरसेवकांवर समाधान मानावे लागले आहे.
पवारांचा करिश्मा की नेत्यांचे अपयश ?
या निकालांनंतर शरद पवार यांचा राजकीय प्रभाव संपल्याची चर्चा सुरू झाली असली, तरी वास्तव वेगळे असल्याचे चित्र समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये शरद पवार स्वतः फारसे सक्रिय नव्हते, मात्र पक्षाचे खासदार, आमदार आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी अपेक्षित कामगिरी न केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिका निहाय चित्र
-
पुणे : शरद पवार गटाला केवळ 3 जागा
-
पिंपरी-चिंचवड : पूर्ण अपयश – 0 जागा
-
सांगली : जयंत पाटील यांच्या प्रयत्नांनंतरही फक्त 3 जागा
-
अहिल्यानगर : खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार असूनही 0 जागा
-
सोलापूर : 4 आमदार व 1 खासदार असूनही 15 पैकी 0 जागा
-
जालना, जळगाव, नागपूर : सर्व ठिकाणी शून्य कामगिरी
ठाणे – एकमेव दिलासा
ठाणे महानगरपालिकेत जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची ताकद सिद्ध करत 12 नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे शरद पवार गटाचे अस्तित्व टिकून राहिले. तसेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतही स्थानिक समीकरणांमुळे 12 नगरसेवक निवडून आले.
एकूण निष्कर्ष
राज्यातील 29 पैकी 21 महानगरपालिकांमध्ये शरद पवार गटाचा एकही नगरसेवक नाही, ही बाब पक्षासाठी गंभीर इशारा मानली जात आहे. नेतृत्वापेक्षा स्थानिक संघटन आणि नेत्यांचे अपयश हे या पराभवाचे मुख्य कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आगामी निवडणुकांवर परिणाम?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात पुन्हा एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, घड्याळ चिन्ह की तुतारी, आणि स्थानिक नेतृत्वाला किती स्वायत्तता दिली जाते, यावर आगामी राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे.











