शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊनही काहीच करू शकले नाही, पवार कुटुंबाचं भविष्य काय असेल ?
पुणे (शशिकांत पाटोळे) : या महापालिकेत ठाकरे ब्रँडच्या पराभवापेक्षा ठळक चर्चा झाली ती पवारांची पॉवर कमी झाल्याची. पुतण्याचे उगवतीचे नेतृत्व आणि काकांचे मावळते नेतृत्वाचे रंग पुसत चालल्याची चिंतेने पुण्यातील राष्ट्रवादीच्या आकाशात काळोख झाला आहे. या पराभवाचे चिंतन होईलच. पण राष्ट्रवादीची दिशा काय असेल, या दोन शकलं असलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी राजकीय भूकंप होईल का? याची चर्चा सध्या रंगली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या जोरदारन मुसंडीने सर्वच समीकरणं बदलून गेली. मुंबईत ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडालेला असतानाच तितकीच जोरदार चर्चा पवारांची पॉवर कमी झाल्याची सुद्धा होत आहे. महायुतीसोबत सत्तेत असलेल्या अजितदादांना महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी बजावता आली नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यातील महापालिकेत इतक्या ठिकाणी भोपळे मिळाले की विचारता सोय नाही. त्यांच्या होमपिचवरही या पक्षाला सर्वात मोठा दणका बसला. दोन्ही पवारांच्या विश्वासहर्तेपासून नेतृत्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता यापुढे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? दोन्ही पक्षांचे अस्तित्व काय असेल. शरद पवार आता महायुतीसोबत जाणार का? राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार का? असे अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतीलच. पण या दोन पवारांच्या भविष्याची चर्चा सुरू झाली हे नक्की.
बालेकिल्ला ढासळला
पुण्यात एकूण १६५ जागांपैकी भाजपने १२० जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पदरात २६ जागांचा जोगवा पडला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १२८ जागांपैकी भाजपने ८४ धावांची सलामी देत दोन्ही राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला. अजितदादांच्या राष्ट्रवादीला इथं ३७ धावांवर आटोपतं घ्यावं लागलं. तर थोरल्या साहेबांच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही.
तेलही गेले तूपही गेले
काकांनी आता थांबावे या विधानापासून ते काकांच्या नेतृत्वाची आणि अनुभवाची गरज असल्यापर्यंत पुतण्याच्या दोन भावनिक छटा राज्याने पाहिल्या. त्यामुळे वितुष्ट आले असतानाही पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुकीत काहीच हाती लागले नाही. या महापालिकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपचा गेम करण्याचा प्लॅन दादांच्या अंगलट आला. मतदारांना दादांनी अनेक आश्वासनं दिली. भाजपवर विखारी टीका केली. भाजपला सोलपटून काढले. पण तेलही गेले आणि तूपही गेले, पुढे हाती धुपटणे आले असं म्हणणं शहाणपणाचा ठरणार नाही. कारण दादा हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. दादांना राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. पण विधानसभा, नगरपालिका-नगरपंचायतीमधील स्ट्रॅटर्जी जशी कामी आली, तसा झंझावात त्यांना राज्यात राखता आला नाही हे नक्की. पण अजितदादांना हलक्यात घेणं चूक ठरेल. त्यामुळेच भाजपने प्रचारतही आणि निकालानंतरही दादांविरोधात विखार दाखवला नाही, यातच खरं त्या पराभवाची भविष्यातील गोळाबेरीज दडलेली आहे. भाजपला दादांना दुखवायचं नाही. तर दादांनाही सत्तेतून बाहेर पडायचं नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत दादा या पराभवाचं उट्टे काढतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.











