मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात नवं राजकीय वळण आलं आहे. महापौर पदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत आता आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “काँग्रेस पक्ष फुटत नाही, तर आमचा पक्ष का फुटेल? आता फोडाफोडीचा खेळ हा भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यातच रंगणार आहे,” असा दावा त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंना विरोधकांपेक्षा मित्रांचीच जास्त भीती :
संजय राऊत म्हणाले, “आम्ही कुठे जेवायला जातो आणि ते कुठे जातात, हे पाहूया. काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत. त्यामुळे आता खरी फोडाफोडी ही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यातच होईल. महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे महापौर पदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची युती असली, तरी दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत तणाव असल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे विजयी नगरसेवक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टोला लगावत, “शिंदेंना विरोधकांपेक्षा मित्रांचीच जास्त भीती आहे,” असं सूचक वक्तव्य केलं.
सहजपणे महापौर बसवणं शक्य नाही :
काही नगरसेवकांना दबावाखाली ठेवण्यात येत असून, ते भाजपाकडं जाऊ नयेत म्हणून त्यांना ‘नजरकैदेत’ ठेवलं जात आहे. हे लोकशाहीला शोभणारं नाही. नगरसेवक हे गुलाम नाहीत, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. महापौर पदाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “सध्याची आकडेवारी पाहता मुंबईत कोणालाही सहजपणे महापौर बसवणं शक्य नाही. प्रत्येकाला इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबईच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.” एकनाथ शिंदे यांनी भाजपासमोर अडीच-अडीच वर्षांचा महापौर पदाचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. मात्र यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं असून, महापौरपदाची लढाई आणखी रंगण्याची चिन्हं आहेत.











