उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभागातील पाच वेळेचे नगरसेवक आणि माजी महापौर अशोक वैती यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या शहाजी खुस्पे यांनी पराभव केला. विजयानंतर शहाजी खुस्पे हे रविवारी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. “गद्दाराच्या दारात तुम्ही मशाल पेटवली, घाबरु नका, बिनधास्त काम करा. मी तुझ्या मागे उभा आहे, शुभेच्छा,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याचं शहाजी खुस्पे यांनी यावेळी सांगितलं.
दिवंगत नेते आनंद दिघेंच्या सहकाऱ्याचा पराभव :
प्रभाग क्रमांक 13 यामध्ये मागील तीस वर्षांपासून अशोक वैती हे नगरसेवक आहेत. अशोक वैती हे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा या निवडणुकीत पराभव करून अगदी राजकारणात नवख्या अशा शहाजी खुस्पे यांनी विजय मिळवला. हा निकाल ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात जॉईंट किलर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. एकनाथ शिंदे राहत असलेल्या प्रभागातच त्यांच्याच ज्येष्ठ नगरसेवकाला हरवल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज अभिमान व्यक्त केला. आपलं सामाजिक कार्य आणि समाजसेवा सुरू ठेवून लोकांचे आशीर्वाद मिळवण्याचं आवाहन त्यांनी शहाजी यांना केलं.
कोण आहेत शहाजी खूस्पे :
शहाजी हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात. मागील सात आठ वर्षांपासून प्रभागातील अडीअडचणीला उभं राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. याच समाजकारणातून त्यांची ओळख निर्माण झाली. या ओळखीचा परिणाम निवडणुकीत उबाठाकडून उमेदवारी मिळण्यासाठी झाली. या उमेदवारीमुळे चक्क दिगजांनाच हरवण्याचं काम शहाजी यांनी केलं. यामुळे आता संपूर्ण ठाण्यात शहाजी यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
युवकांचं मोठं सहकार्य :
शहाजी यांना त्यांच्या कुटुंबीयांचा जसा पाठिंबा आहे, तसा प्रभागातील युवकांचा देखील मोठा पाठिंबा आहे. यातूनच साम दाम दंड भेद अशा सर्वच बाबतीत उजव्या ठरणाऱ्या उमेदवाराचा पराभव शहाजी यांनी युवकांच्या जीवावर केला. भविष्यात चांगलं काम करून ‘अडचणी मुक्त ठाणे शहर’ अशी ओळख शहाजी यांना करायची आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.











